Pune Crime – पुणे शहर पुन्हा एकदा अल्पवयीन मुलींवरील वाढत्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांनी हादरले आहे. नसरापूर, दक्षिण महाळुंगे येथील अमानुष घटनांचे पडसाद अद्याप शांत झाले नसतानाच पर्वती पायथा परिसरात ६२ वर्षीय आजोबाने स्वतःच्या नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना घडली. शहरातील वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे आमची मुलं सुरक्षित आहेत का? असा एकच प्रश्न पालकांच्या मनात उभा राहिला आहे. जानेवारी ते मार्च २०२६ या अवघ्या तीन महिन्यांत शहरात बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत तब्बल ५० गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यातील बहुतांश प्रकरणांमध्ये आरोपी हे पीडितांच्या ओळखीतील, नातेवाईक किंवा जवळच्या व्यक्ती असल्याचे समोर आले आहे. विनयभंगाच्या १४९ घटनाही याच कालावधीत नोंदविण्यात आल्या आहेत. परंतु, प्रकरणांमध्ये दोषारोपपत्र दाखल झाले तरी अंतिम निकाल लागण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. परिणामी, आरोपींना कायद्याची भीतीच राहिली नसल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. डिजिटल पोर्नोग्राफीमुळे वाढतेय विकृती ? समाजातील वाढत्या लैंगिक विकृतीमागे इंटरनेटवरील सहज उपलब्ध होणारे हिंसक आणि अश्लील साहित्य, सोशल मीडियावरील विकृत रील्स आणि डिजिटल पोर्नोग्राफी हे एक मोठे कारण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तज्ज्ञांच्या मते, केवळ पोलिसी कारवाई पुरेशी ठरणार नाही. शाळांमध्ये लैंगिक शिक्षण, पालक-मुलांमधील मोकळा संवाद, सोशल मीडिया जागरूकता आणि फास्ट ट्रॅक कोर्टांद्वारे जलद शिक्षा होणे गरजेचे आहे. आरोपींना ३ ते ६ महिन्यांच्या आत कठोर शिक्षा झाली तरच समाजात भीती निर्माण होईल, असे मत कायदेतज्ज्ञांनी व्यक्त केले. महिला आणि अल्पवयीन मुलींवरील वाढते अत्याचार हे केवळ गुन्हेगारीचे नव्हे, तर समाजाच्या संवेदनशीलतेच्या ऱ्हासाचेही आहे.