Pune : विघ्नहर्त्या गणरायाचे आज आगमन…; मानाच्या गणेशाची प्रतिष्ठापना तपशील जाणून घ्या

ॐ नमोजि गणनायेका।
सर्व सिद्धीफळदायेका।
अज्ञानभ्रांतिछेदका।
बोधरूपा।।
असा हा गणांचा स्वामी, बुद्धीचा देवता, १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असलेल्या गणरायाचे आगमन काही तासांवरच येऊन ठेपले आहे. त्यामुळे एकूण शहरामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यातून पुणे ही सांस्कृतिक नगरी असल्याने अधिकच उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते. त्यातून मानाच्या गणपतीची मिरवणूक हीदेखील वैभवशाली असते. १३० वर्षांची दीर्घ परंपरा असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवात अन्य प्रसिद्ध मंडळांची मिरवणूकही पाहण्याजोगी असते.
मानाच्या गणपतींच्या आगमनाचे विशेष
मानाचा पहिला – श्री कसबा गणपती
मूर्तिकार अभिजीत धोंडफळे यांच्या वास्तूतून श्रींची मिरवणूक सकाळी १०वाजता निघणार आहे. दरवर्षीप्रमाणे श्रींची मूर्ती चांदीच्या पालखीमध्ये विराजमान होणार आहे. रास्ता पेठ पॉवर हाउस, अपोलो थिएटर चौक, दारूवाला पूल, देवाजी बाबा चौक, फडकेहौद मार्गे उत्सव मंडपात आगमन होणार.
या मिरवणुकीत संघर्ष ढोल ताशा पथक, श्रीराम ढोल ताशा पथक, अभेद्य ढोल ताशा पथक सहभागी होणार असून, मूर्तीची प्रतिष्ठापना सवितानंद महाराज यांच्या हस्ते ११ वाजून ३७ मिनिटांनी करण्यात येणार आहे.
मानाचा दुसरा – श्री तांबडी जोगेश्वरी गणपती
श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाचे गणेशोत्सवाचे हे १३३ वे वर्ष आहे. श्रीच्या आगमनाची मिरवणूक सकाळी १० वाजता नारायण पेठेतील केळकर रस्त्यावरील मंदार लॉज येथून निघेल. कुंटे चौक, नगरकर तालीम चौक, अप्पा बळवंत चौकमार्गे ती उत्सव मंडपात पोहोचेल. आढाव बंधूंचे नगारावादन, न्यू गंधर्व ब्रास बॅण्ड, शिवमुद्रा ढोल-ताशा पथक, ताल पथक, विष्णुनाद शंख पथक मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.
या गणपतीचीही मिरवणूक चांदीच्या पालखीतच निघते. दुपारी १२.११ वाजता सनई-चौघड्याच्या निनादात श्रींची प्रतिष्ठापना वासुदेव निवास आश्रम, पुणे या महायोग शक्तिपीठाचे प्रधान विश्वस्त प.पू. योगश्री शरदशास्त्री जोशी यांच्या हस्ते होणार आहे. यंदाच्या वर्षी मंडळाने साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराची प्रतिकृती साकारली आहे.
मानाचा तिसरा – श्री गुरुजी तालीम गणपती मंडळ
पुण्याचा राजा मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाचे उत्सवाचे हे १३९ वे वर्ष आहे. श्रींची आगमन मिरवणूक सकाळी ११ वाजता गुरुजी तालीम गणपती मंदिर येथून निघणार आहे. पुढे गणपती चौक, लिंबराज महाराज चौक, अप्पा बळवंत चौक, जोगेश्वरी चौक, गणपती चौकातून ती उत्सव मंडपात पोहोचेल. स्वप्निल आणि सुभाष या सरपाले बंधूंनी साकारलेल्या फुलांच्या आकर्षक रथातून श्रींची मिरवणूक निघणार आहे.
मिरवणुकीत जयंत नगरकर यांचे नगारावादन, अश्वराज ब्रास बँड, गुरुजी प्रतिष्ठान ढोल ताशा पथक, राघमंत्र ढोल ताशा पथक, विघ्नहर्ता ढोल ताशा पथक सहभागी होणार आहेत. दुपारी २ वा. ३५ मिनिटांनी गणेशाची प्रतिष्ठापना उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते होणार आहे. यंदाच्या वर्षी अहल्यानगरचे चे सजावटकार शुंभकर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण फायबर ग्लासमध्ये बनवलेल्या बारा ज्योतिर्लिंगामधील एक असलेल्या वाराणसीच्या श्री काशी विश्वनाथ मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
मानाचा चौथा – श्री तुळशीबाग गणपती मंडळ
सांस्कृतिक पुण्यनगरीतील मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट यंदाच्या वर्षी सन २०२५ मध्ये शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. श्रीं ची प्रतिष्ठापना आळंदी देवाजी येथील प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ महाराज यांच्या हस्ते दु.१ २ वाजून १५ मिनिटांनी होणार आहे, तर देखाव्याचे उद्घाटन उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते होणार आहे.
मानाचा पाचवा – केसरीवाडा गणेशोत्सव मंडळ
मानाचा पाचवा केसरीवाडा गणेशोत्सवाच्या प्रतिष्ठापना मिरवणुकीला सकाळी नऊ वाजता रमणबाग चौकातून सुरुवात होणार आहे. परंपरेनुसार मानाच्या पालखीत बाप्पा विराजमान असतील. सकाळी १० वाजता रौनक रोहित टिळक यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना होईल.
सकाळी ११ वाजता गणरायाची महाआरती होईल. त्यानंतर श्रीराम आणि शिवमुद्रा या ढोल ताशा पथकांचे टिळकवाड्यात स्थिर वादन होईल. बिडवे बंधू यांचे सनई-चौघडा वादनही होणार आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती व ‘केसरी’चे विश्वस्त-संपादक डॉ. दीपक टिळक यांचे नुकतेच निधन झाले असल्यामुळे यंदाचा उत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे.
अन्य प्रसिद्ध गणपती
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ
यंदाच्या गणेशोत्सवात केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. मध्यप्रदेश चित्रकुट येथील अनंत श्री विभूषित जगद्गुरू श्री रामानुजाचार्य श्री झालरिया पीठाधीश्वर श्री श्री १००८ प.पू. स्वामी घनश्यामाचार्य महाराज यांच्या हस्ते सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी श्रींची प्रतिष्ठापना होणार आहे. तत्पूर्वी सकाळी ८.३० वाजता मुख्य मंदिरापासून फुलांनी सजविलेल्या आकर्षक रथातून श्रींची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे.
आकर्षक फुलांची सजावट आणि रथावर भगवान पद्मनाभ स्वामींची भव्य निद्रिस्त मूर्ती स्थापित केली आहे. मुख्य मंदिर, अप्पा बळवंत चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडईमार्गे उत्सव मंडपात मिरवणूक येणार आहे. देवळणकर बंधूचा चौघडा, गायकवाड बंधू सनई, दरबार बँड, प्रभात बँड, मयूर बँड आणि गंधाक्ष ढोल-ताशा पथकाचा मिरवणुकीत सहभाग असणार आहे.
अखिल मंडई गणपती मंडळ
फुलांनी सजलेल्या भव्य मयूर रथातून अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाची आगमन मिरवणूक सकाळी १० वाजता निघणार आहे. श्रींची प्रतिष्ठापना दुपारी १२ वाजता युनिटी एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन नवीनचंद्र आणि स्नेहल मेनकर या दाम्पत्याच्या हस्ते होणार आहे.
अखिल मंडई मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदा १३२ वे वर्ष आहे. उत्सव मंडप, मंडई पोलीस चौकी, बाबू गेनू चौक, रामेश्वर चौक, गोटीराम भैया चौक येथून पुन्हा उत्सव मंडप अशी मिरवणूक निघणार आहे. मिरवणुकीत न्यू गंधर्व बँड पथक, मल्हार ढोल ताशा पथक, स्वराज्य पथक, समर्थ पथक वादन करतील.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्ट
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पाची प्रतिष्ठापना प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते बुधवारी दुपारी १२ वाजून १५ मिनिटांच्या मुहूर्तावर होणार आहे. त्यापूर्वी ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येणार आहे. मंडळाचे उत्सव प्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन यांनी याबाबत माहिती दिली.
गणेश चतुर्थीला सकाळी बाप्पाची आरती होईल. त्यानंतर सकाळी साडेआठ वाजता प्रत्यक्ष मिरवणुकीला सुरवात होईल. सुरवातीला लाठीकाठी हा मर्दानी खेळ आणि केशव शंखनाद होईल. त्यानंतर सात पथकांकडून रंगारी भवनासमोर ढोल-ताशांची सलामी दिली जाणार आहे. श्रीराम पथक, कलावंत, वाद्यवृंद, विश्वगर्जना, स्वयंभूगर्जना, गजर, नूमवि ही सात ढोल ताशा पथके मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही मंडळाचे कार्यकर्ते रथ ओढणार आहेत.
मागील वर्षी जया किशोरी यांनी बाप्पाच्या दर्शनासाठी भेट दिल्यानंतर त्यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार यंदा हा मान त्यांना देण्यात आला आहे. बाप्पाचे सेवेकरी म्हणून आम्हा सर्वांसाठीच ही गोष्ट अत्यंत आनंद देणारी आहे. – पुनीत बालन, उत्सव प्रमुख आणि विश्वस्त, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट.





