Pune : क्रांतिवीर राघोजी भांगरे चरित्रग्रंथाचे प्रकाशन उत्साहात
Pune: डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद; आदिवासी क्रांतिकारकांच्या इतिहासाचे जतन काळाची गरज

Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या वतीने आयोजित प्रा. डॉ. तुकाराम रोंगटे लिखित ‘क्रांतिवीर राघोजी भांगरे’ या चरित्रग्रंथाचे प्रकाशन व परिसंवाद मंगळवारी (दि. २३) विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाच्या चर्चासत्र सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीत आणि महाराष्ट्र गीताने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षपूजन करण्यात आले. ज्येष्ठ समीक्षक तथा ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते चरित्रग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ कवी व आदिवासी चळवळीतील कार्यकर्ते कवी वाहरू सोनवणे, डॉ. सुधाकर शेलार, प्रा. विठ्ठल शेवाळे, डॉ. हर्ष गायकवाड, डॉ. सुनील भंडगे, डॉ. प्रभाकर देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “स्वातंत्र्यपूर्व काळात अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या आदिवासी नायकांचे योगदान इतिहासात पुरेशा प्रमाणात नोंदले गेले नाही. अशा परिस्थितीत डॉ. तुकाराम रोंगटे यांनी केलेले संशोधन आणि लेखन अत्यंत मोलाचे असून, नव्या पिढीसमोर आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांचा प्रेरणादायी इतिहास उभा करणारे आहे.”
प्रमुख पाहुणे कवी वाहरू सोनवणे यांनी राघोजी भांगरे यांच्या संघर्षमय जीवनाचा आढावा घेत त्यांच्या कार्याची सामाजिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी उलगडून सांगितली. भारतीय इतिहासात आदिवासी क्रांतिकारकांची झालेली उपेक्षा चिंताजनक असल्याचे नमूद करत त्यांनी आदिवासी समाजाच्या स्वाभिमान आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा गौरव केला.
परिसंवादात डॉ. सुधाकर शेलार, प्रा. विठ्ठल शेवाळे आणि कवी वाहरू सोनवणे यांनी ग्रंथाचे चिकित्सक परीक्षण केले. ग्रंथातील ऐतिहासिक संदर्भ, संशोधनपर दृष्टिकोन आणि राघोजी भांगरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रभावी चित्रण यांचे त्यांनी कौतुक केले.
ग्रंथाचे लेखक प्रा. डॉ. तुकाराम रोंगटे यांनी मनोगतातून चरित्रलेखनाची प्रेरणा आणि भूमिका स्पष्ट केली. तसेच चरित्राच्या अभ्यासासाठी केलेल्या संशोधनाचा आढावा घेत आदिवासी इतिहासातील दुर्लक्षित, परंतु अत्यंत महत्त्वाच्या क्रांतिवीराचे कार्य समाजासमोर आणण्याचा प्रयत्न या ग्रंथाद्वारे केल्याचे सांगितले.
कार्यक्रमास अधिसभा सदस्य डॉ. हर्ष गायकवाड, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख डॉ. सुनील भंडगे, मानवविद्या विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रभाकर देसाई यांची उपस्थिती लाभली. मराठी विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमासाठी ‘हर्मिस’ प्रकाशन, पुणेचे प्रा. सुशील धसकटे यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमास विविध विभागांतील प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी, कर्मचारी, साहित्यप्रेमी तसेच आदिवासी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. उमेश सिरसट यांनी केले, तर आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.





