पुणे : कमी वेळात होणार जमीन मोजणी

पुणे – जमीन मोजणीसाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी भूमिअभिलेख विभाग अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू करणार आहे. जमीन मोजणीसाठी जीपीएस रीडिंग घेण्यासाठीचा वेळ कमी करण्यासाठी भूमिअभिलेख विभागाने सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने राज्यात 77 ठिकाणी “कॉर्स’ (कन्टिन्यूस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन) उभारले आहे. याची तांत्रिक तपासणीचे काम सुरू आहे. त्यानंतर “कॉर्स’ आधारे जीपीएस रीडिंग फक्त 30 सेंकदात घेता येणार असून या सुविधेमुळे जमीन मोजणीसाठी लागणारा वेळ कमी होणार आहे.
सद्य:स्थितीत जमीन मोजणीसाठी ईटीएस मशीनच्या साहाय्याने मोजणी करणे हा पण एक पर्याय उपलब्ध आहे. संबंधित जागेवर जीपीएस रीडिंग घेऊन त्या क्षेत्राचे अक्षांक्ष व रेखांश घेतले जाते. या अक्षांक्ष व रेखांशच्या आधारे जमीन मोजणी करणे सोयीचे ठरते. मात्र, सध्याच्या अस्तित्वात असलेल्या तंत्रज्ञानानुसार अचूक जीपीएस रिडींग घेण्यासाठी किमान एक तास ते चार तास लागतात. जीपीएस रीडिंग घेण्यासाठीचा हा वेळ कमी करण्यासाठी राज्य शासनाच्या भूमिअभिलेख विभागाने सर्वे ऑफ इंडिया च्या मदतीने “कॉर्स’ या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार आहे.
यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कॉर्स स्टेशनचे जाळे उभारले आहे. सद्य:स्थितीत सर्व्हे ऑफ इंडियाकडून या स्टेशनची जीपीएस रीडिंगची अचुकता तपासणीचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर कॉर्सद्वारे जमीन मोजणीस सुरुवात होणार आहे, अशी माहिती भूमि अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.





