Sushma Andhare post : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळा प्रकरणावरून गंभीर आरोप करण्यात येत आहेत. पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीकडून १८०० कोटींचे बाजारभाव असणारी जमीन केवळ ३०० कोटींमध्ये खरेदी करण्यात आली, असा आरोप होत आहेत. तशी कागदपत्रे समाजमाध्यमातून समोर येत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. या व्यवहारात शासनाची १५२ कोटींची फसवणूक करण्यात आली असून, जमीन खरेदी करताना केवळ ५०० रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आला आहे. आता या प्रकरणी उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्ट लिहून जमीन प्रकरणातील पार्थ पवार यांची सही असलेला एक कागदपत्राचा फोटो शेअर केला आहे. यामुळे या प्रकरणात पार्थ पवार यांचा पाय आणखी खोलात जाणार असल्याची चर्चा होत आहे. सुषमा अंधारेंचा सवाल अंधारेंनी पोस्टमधून काही सवाल उपस्थित केले आहेत. पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल होण्यापासून वाचवण्याचा मुंद्रांक विभाग आणि पोलिस प्रयत्न करत आहेत का ? एकच दस्त ९०१८/२२५ नोंदणीत वापरलेला असताना आणि विशेष म्हणजे जिल्हा इंडस्ट्री बोर्डाच्या मुद्रांक माफीच्या ठरावावर पार्थ पवारांची सही आहे हे चौकशी अहवालात नमूद असूनही पार्थ पवारांच नाव घेणं यंत्रणांनी का टाळलं ? असे सवाल त्यांनी पोस्टमधून विचारले आहेत. या प्रकरणावरून राजकीय वातावरण देखील तापले असून, पार्थ पवार यांच्यावर विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी महायुती सरकारला धारेवर धरले आहे. अजित पवार आज काय बोलणार? अजित पवार यांनी माझा या प्रकरणाशी दुरान्वये संबंध नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. माहिती घेऊन यावर आज सविस्तर बोलेन, असे देखील ते प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत. त्यामुळे अजित पवार आज या प्रकरणावर आणि पार्थ पवार यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर काय बोलतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे. या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून, त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात काही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर या प्रकरणी २ जणांवर गुन्हे दाखल केले आहे. मात्र, यामध्ये पार्थ पवार यांचे नाव नसल्याचे समोर आले आहे. तक्रारदाराने ३ जणांवर सुमारे 6 कोटींचा मुद्रांक शुल्क न भरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हेही वाचा : Satara : विकासाच्या मुद्द्यावर लोक भाजपमध्ये प्रवेश करतात : आमदार मनोज घोरपडे