Pune Land Dispute : धर्मादाय आयुक्तांकडून पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याचे आदेश

पुणे : मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेल्या जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याचे आदेश धर्मदाय आयुक्तांकडून देण्यात आले आहेत. आयुक्तांकडून काही दिवसांपूर्वी सुनावणी घेण्यात आली होती, यावर आज निर्णय देण्यात आला. हा व्यवहार जरी रद्द झाला असला तरी गोखले बिल्डरला व्यवहाराचे पैसे आणि स्टॅंप ड्यूटीचे पैसे परत मिळवण्यासाठी कोर्टात धाव घ्यावी लागणार आहे.
हा व्यवहार रद्द करण्यासाठी बिल्डर विशाल गोखले आणि ट्रस्टी यांनी प्रतिज्ञापत्र दिले होत. या व्यवहाराचे सेल डीड येत्या २ आठवड्यात कागदोपत्री रद्द व्हावे, अशी याचिकाकर्त्यांकडून मागणी करण्यात आली होती. यावर आज धर्मदाय आयुक्तांनी निर्णय दिला. या आदेशानंतर गोखले बिल्डरला २३० कोटी मिळणार आहेत मात्र स्टॅंप डयूटीची रक्कम परत मिळवण्यासाठी त्यांना कोर्टाची पायरी चढावी लागणारआहे.
काय आहे नेमके प्रकरण?
मॉडेल कॉलनीतील मोक्याच्या ठिकणी असलेली जैन बोर्डिंगची जागा गोखले कंस्ट्रक्शन कंपनीला २३० कोटींना ट्रस्टीकडन विकण्यात आल्याचा प्रकार समोर येताच जैन समाजासह विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. या विरोधात मोर्चाही काढण्यात आले. माजी खासदार राजू शेट्टींसह, माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी हे प्रकरण मोठ्या प्रमाणात उचलून धरले होते.
यानंतर धर्मादाय आयुक्तांनी गेल्या सोमवारी (२० ऑक्टोबर) अतितातडीची सुनावणी घेतली. यावेळी धर्मादाय आयुक्त अमोघ कलोटी यांनी जागा विक्री प्रकरणाला स्थगिती दिली. त्यानंतर आज हा व्यवहार रद्द करण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तांकडून देण्यात आले.





