पुणेकरांसाठी खुशखबर! म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ ; आता ‘या’ रखेपर्यंत करता येणार अर्ज

प्रभात वृत्तसेवा
पुणे – म्हाडाने पुणे, पिंपरी- चिंचवड शहर आणि पीएमआरडीए मधील 6 हजार 168 घरांसाठी सोडत जाहीर केली होती. त्यासाठी 31ऑक्टोबरपर्यंत मुदत होती. मात्र, कागदपत्रांची पूर्तता व इतर कारणास्तव अर्ज करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याविषयी नागरिकांकडून मागणी होत होती. त्यामुळे म्हाडाने अर्ज २० नोव्हेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती म्हाडा पुणे विभागाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे यांनी दिली.म्हाडाच्या सोडतीस नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतील सदनिकांची संख्या 1 हजार 683, तर पीएमएवाय योजनेतील सदनिकांची संख्या 299 इतकी आहे. 15 टक्के व 20 टक्के योजनेतील सदनिकांची एकूण संख्या 4 हजार 186, पुणे महापालिका हद्दीत १ हजार 538, पिंपरी- चिंचवड महापालिका हद्दीत १ हजार 534 आणि पीएमआरडीए हद्दीतील सदनिकांची संख्या १ हजार 114 आहे.म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी अर्जदारांनी प्रथम www.housing.mhada.gov.in या संकेतस्थळला भेट द्यावी.
तसेच प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावरील योजनांच्या सदनिकांसाठी www.bookmayhome.mhada.gov.in तसेच lottery.mhada.gov.in या संकतेस्थळाला भेट द्यावी. अर्ज प्रक्रियेबाबत मदतीसाठी ०२२-६९४६८१०० या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन साकोरे यांनी केले आहे. सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदारांनी अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये, तसे केल्यास पुणे मंडळ कोणत्याही व्यवहारास अथवा फसवणुकीस जबाबदार राहणार नसल्याचेही म्हाडाने स्पष्ट केले आहे.





