Jain Boarding : जैन बोर्डिंग प्रकरणी समाज आक्रमक! देशभरात जैन समाज बांधव आज उपवास करणार

प्रभात वृत्तसेवा
पुणे – मॉडेल कॉलनीतील जैन बोर्डिंग हाउसच्या जमीनीचा विक्री व्यवहार (सेल डीड) तत्काळ रद्द करून न्याय द्यावा यासाठी देशभरातील जैन समाज बांधव बुधवारी (दि.२९) एकदिवसीय उपवास करणार आहेत. जमीन आणि मंदिर जैन समाजाकडे पुन्हा येईपर्यंत लढा सुरुच राहणार असल्याचे जैनमुनी आचार्य गुप्तीनंद महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे.शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी जैन बोर्डिंग प्रकरणात भाजपचे खासदार आणि केंद्रीय राज्य मंत्री असलेल्या मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले होते, त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली.
मोहोळ यांनी आरोपांनंतर थेट जैन बोर्डिंगमध्ये जाऊन जैन मुनींची भेट घेतली होती व प्रश्न सोडविण्याचे आश्वासनही दिले आहे. मात्र, अद्याप प्रश्न सुटलेला नाही.मुंबई येथे धर्मादाय आयुक्तांकडे मंगळवारी (दि.२८) जैन बोर्डिंग सुनावणी झाली. गोखले बिल्डर व ट्रस्टी यांनी माघार घेण्याची तयारी दर्शविली असली तरी अद्याप कायदेशीररित्या प्रश्न सुटलेला नाही. ३० ऑक्टोबरला धर्मादाय आयुक्तांकडे पुन्हा सुनावणी होणार आहे. जोपर्यंत सेल डीड रद्द झाल्याचा कागद जैन समाजाच्या हाती येत नाही तोपर्यंत साधना, आंदोलन, लढा सुरूच राहणार आहे.
देशभरात जैन बांधव एकदिवसीय उपवास करणार आहेत. यात जैन समाज बांधवातील सर्वच जण सहभागी होणार असल्याचे जैनमुनी आचार्य गुप्तीनंद महाराज यांनी जाहीर केले आहे. आमचे आंदोलन राज्य शासन अथवा कोणत्याही राजकीय पक्षाविरोधात नाही. जैन मंदिर, बोर्डिंग विकण्याचा गैरव्यवहाराच्या विरुध्द आंदोलन आहे. १ नोव्हेंबरपासून अन्नत्याग आंदोलनही करण्यावर ठाम असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह संपूर्ण मंत्रीमंडळाने स्वतः जैन बोर्डिंगमध्ये येवून प्रायश्चित्त करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.





