Pune : बुधवार पेठेतील कुंटणखाना तीन वर्षांसाठी सील; “नो टॉलरन्स” धोरणाअंतर्गत पोलीस आयुक्तांची कारवाई

पुणे – पुणे शहरातील बुधवार पेठ भागात असलेल्या एका कुंटणखान्यात बांग्लादेशी अल्पवयीन मुलीकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणात फरासखाना पोलिसांनी दोघांना अटक केली असून, संबंधित कुंटणखाना तीन वर्षांसाठी सील करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या “नो टॉलरन्स” धोरणाअंतर्गत करण्यात आली आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फरासखाना पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, या आरोपींनी बांग्लादेशी अल्पवयीन मुलीला फसवून व जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलले होते. यासंदर्भात चौकशी आणि पुरावे प्राप्त झाल्यानंतर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी संबंधित ठिकाणावर कारवाईचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे सादर केला होता.
या प्रस्तावाची सुनावणी करून पोलीस आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी अमितेश कुमार यांनी कुंटणखान्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम १९५६ चे कलम १८(१)(अ) अंतर्गत तीन वर्षांसाठी सील करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार दिनांक २८ जुलै २०२५ रोजी दोन पंचासमक्ष फ्लॅट नं. १८/ए, तिसरा मजला, नवीन बिल्डिंग, बुधवार पेठ येथील कुंटणखाना सीलबंद करण्यात आला.
ही कारवाई सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, उपआयुक्त कृषिकेश रावले, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.





