Pune Kolhapur Railway: विद्युत मार्गावर डिझेलचा प्रवास कशासाठी? पुणे-कोल्हापूर रेल्वे प्रवाशांचा संतापजनक सवाल…नेमकं प्रकरण काय?
Pune Kolhapur Railway: जुन्या डेमू (DEMU) गाड्यांमधील तांत्रिक बिघाडामुळे प्रवासी त्रस्त; आधुनिक मेमू (MEMU) गाड्या सुरू करण्याची तीव्र मागणी.

Pune Kolhapur Railway – पुणे–सातारा–मिरज–कोल्हापूर रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण आणि दुहेरीकरण पूर्ण होऊन आधुनिक रेल्वे वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला असला, तरी या मार्गावरील अनेक पॅसेंजर गाड्या अद्यापही डिझेलवर धावत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. जुन्या डेमू (डीईएमयू) गाड्यांमधील वारंवार होणारे तांत्रिक बिघाड, विलंब आणि देखभालीच्या समस्या यामुळे दैनंदिन प्रवाशांचा त्रास वाढला असून, या गाड्यांच्या जागी आधुनिक मेमू (एमईएमयू) गाड्या सुरू करण्याची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे.
सध्या पुणे–कोल्हापूर, पुणे–मिरज तसेच सातारा–पुणे या मार्गांवर डेमू पॅसेंजर गाड्या धावत आहेत. मात्र, या गाड्यांच्या इंजिनांमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने अनेकदा गाड्या उशिराने धावतात किंवा मधेच थांबतात. परिणामी विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि सर्वसामान्य प्रवाशांचा वेळ वाया जात असून त्यांना मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत आहे.
रेल्वेच्या इंधन बचत आणि पर्यावरणपूरक वाहतुकीच्या धोरणानुसार विद्युतीकरण झालेल्या मार्गांवर मेमू गाड्या अधिक परिणामकारक ठरू शकतात. विद्युत ऊर्जेवर चालणाऱ्या या गाड्यांचा वेग तुलनेने अधिक असून देखभाल खर्च कमी आणि कार्यक्षमता जास्त असल्याचे रेल्वे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे प्रवासाचा कालावधी कमी होण्यासोबतच इंधन खर्चात बचत आणि कार्बन उत्सर्जनातही मोठी घट होऊ शकते.
मिरज–पुणे मार्गाचे विद्युतीकरण आणि दुहेरीकरण पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील बहुतांश एक्स्प्रेस गाड्या आता विद्युत इंजिनावर धावत आहेत. मात्र, पॅसेंजर सेवांसाठी अजूनही डिझेल डेमू गाड्यांवर अवलंबून राहावे लागत असल्याने “विद्युत मार्गावर डिझेल गाड्या का?” असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
रेल्वे प्रशासनाकडून उपलब्ध रेक, देखभाल सुविधा, प्रवासी संख्या आणि परिचालनाच्या गरजा लक्षात घेऊन काही मार्गांवर डेमू गाड्यांचा वापर सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी पुणे, सातारा, मिरज आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या स्थानकांना आधुनिक मेमू सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.
कोल्हापूर–मिरज–सातारा–पुणे या महत्त्वाच्या प्रवासी मार्गावरील डेमू गाड्यांचे मेमूमध्ये रूपांतर करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे अनेक वेळा करण्यात आली आहे. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य सुकुमार पाटील यांनी केला आहे. प्रवाशांच्या वाढत्या गरजा आणि आधुनिक रेल्वे सेवांची आवश्यकता लक्षात घेता या मार्गावर मेमू सेवा सुरू करण्याचा निर्णय तातडीने घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
विद्युतीकरण झाले, तरी काही गाड्या डिझेलवर
सुमारे २८० किलोमीटर लांबीच्या मिरज–पुणे रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण आणि दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे या मार्गावरील बहुतांश एक्स्प्रेस गाड्या विद्युत इंजिनावर धावत आहेत. मात्र, गोव्याकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावरील लोंढा–गोवा दरम्यानचे काही काम अद्याप पूर्ण न झाल्याने काही गाड्यांना डिझेल इंजिनाचा वापर करावा लागत आहे. तथापि, पूर्णपणे विद्युतीकरण झालेल्या पुणे–मिरज–कोल्हापूर मार्गावर पॅसेंजर सेवांसाठी अजूनही डेमू गाड्या धावत असल्याने प्रवाशांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.






