पुणे : किडनी तस्करी प्रकरण; चौकशी अहवाल न्यायालयात सादर

पुणे –किडनी रॅकेट प्रकरणाचा चौकशी अहवाल चौकशी समितीने सोमवारी न्यायालयाला सादर केला आहे. मात्र, न्यायालयाने तो अद्याप सबमिट करून घेतला नाही. किडनी तस्करी प्रकरणात कोल्हापूरच्या महिलेची फसवणूक झाली होती. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती. कबूल केलेले पैसे आपल्याला मिळाले नाहीत, अशी तक्रार संबंधित महिलेने केली. रुग्णाची पत्नी असल्याचे खोटे सांगून या महिलेने किडनी विकल्याचे प्रकरण समोर आले होते.
नाशिक येथील वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. त्यानंतर खासगी रुग्णालयाचा अवयव प्रत्यारोपण परवाना निलंबित केला होता. तसेच, अवयव प्रत्यारोपण विभागीय मान्यता समितीचे अधिकार काढले होते. मात्र त्यानंतर गेल्या आठवड्यात इनकॅमेरा चौकशी करण्यात आली.
संबंधित खासगी रुग्णालयाच्या चौकशीचा अहवाल आरोग्य संचालक कार्यालयाने (डीएचएस) दिला आहे. आमच्या समितीचा (डीएमईआर) अहवाल आम्ही सोमवारी न्यायालयाला सादर केला. मात्र “डीएचएस’च्या अहवालावर सुनावणी झाल्यानंतर आम्ही दिलेला अहवाल न्यायालय सबमिट करून घेईल. हा न्यायालयीन विषय असल्याने त्यामध्ये तपशीलवार काही बोलता येणार नाही.
– डॉ. दिलीप म्हैसेकर, संचालक, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन





