pune : खासदार क्रीडा महोत्सवाचा गुरुवारी समारोप

सुपरस्टार अक्षयकुमारची विशेष उपस्थिती
पुणे – पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाचा येत्या गुरुवारी (२७ नोव्हेंबर) समारोप होणार आहे. खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत दोन आठवडे विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. बालगटापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आणि महिलांपासून दिव्यांगांपर्यंत अशा सर्वांचा मोठा प्रतिसाद या स्पर्धेला लाभला.
पुणे शहरातील २९ मैदाने आणि क्रीडा संकुलांमध्ये ३७ खेळांच्या विविध स्पर्धा या खासदार क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आल्या. त्यामध्ये तब्बल ४० हजारांहून अधिक आबालवृद्ध, दिव्यांग खेळाडूंनी सहभाग घेतला. गणेश कला क्रीडामंच येथे गुरुवारी सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार असून, या वेळी प्रसिद्ध कलाकार अक्षय कुमार उपस्थित राहणार आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असल्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
गेल्या महिन्याभरापासून स्पर्धा सुरू होत्या. खेळाडूंना एक चांगले व्यासपीठ मिळाले. नवोदित खेळाडूंना अनुभवी खेळाडूंचे मार्गदर्शन मिळाले. अनेक स्पर्धा चुरशीच्या झाल्या. यातील विजेते उद्या आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करतील, तर आश्चर्य वाटायला नको. या स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय खेळाडू नेमबाज अंजली भागवत यांनी व्यक्त केली.





