Pune : खडकी मेट्रो स्थानक आजपासून प्रवासी सेवेत

पुणे – मेट्रोच्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी असून, खडकी मेट्रो स्थानक उद्यापासून (शनिवार) प्रवासी सेवेत दाखल होत असून, या स्थानकामुळे मेट्रो आणि रेल्वे या दोन्ही वाहतुकीचे एकत्रीकरण शक्य झाले आहे.
हे स्थानक पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील पिंपरी- चिंचवड मनपा ते स्वारगेट या महत्त्वाच्या मार्गावर आहे. खडकी रेल्वे स्थानकाच्या अगदी जवळ असल्यामुळे मेट्रो स्थानकातून प्रवाशांना थेट रेल्वे स्थानकात जाणे शक्य होणार आहे. त्यामुळे खडकी परिसरातील नागरिकांना, तसेच रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मेट्रो सेवा वापरणे अधिक सुलभ होईल.
नवीन स्थानकामुळे खडकी, पुणे विद्यापीठ, औंध आयटी पार्क, खडकी कॅन्टोन्मेंट, खडकी बाजार, रेंज हिल, औंध रस्ता, ऑर्डिनन्स फॅक्टरी हॉस्पिटल आणि मुळा रस्ता या परिसरात प्रवास करणाऱ्या नागरिकांची सोय होणार आहे. या मार्गावर असलेल्या सर्व स्थानकांचे काम पूर्ण झाले होते. प्रत्यक्षात मार्ग सुरू झाल्यानंतर या स्थानकाचे काम मेट्रोकडून हाती घेण्यात आले होते. अखेर ते पूर्ण झाले आहे.
“पुणे मेट्रोच्या विस्तारात खडकी स्थानकाची भर पडल्याने पुणे व पिंपरी-चिंचवड या जुळ्या शहरांदरम्यानची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट झाली आहे.”- श्रावण हर्डीकर (महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक)





