Pune News : घरफोडी करणाऱ्या काका-पुतण्याला बेड्या, २.२४ कोटींचे सोने जप्त; खडक पोलिसांची मोठी कारवाई
Pune News : पुण्यातील सराफ बाजाराचे केंद्र असलेल्या रविवार पेठेत बंद घराचे कुलूप तोडून तब्बल सव्वादोन कोटी रुपयांचे सोने लंपास करणाऱ्या काका-पुतण्याच्या जोडीला खडक पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवून अवघ्या १२ तासांच्या आत गजाआड केले आहे.

Pune News : पुण्यातील रविवार पेठेत घराचे कुलूप तोडून तब्बल दोन किलो २०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि सोन्याची बिस्किटे चोरी करणाऱ्या काका-पुतण्याला खडक पोलिसांनी अवघ्या १२ तासांत अटक केली. मुस्तफा नजीर शेख (वय ३६) आणि सरफराज ऊर्फ आवेज मैनुद्दीन शेख (वय २२) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. (Pune News)
पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या सोन्यासह अतिरिक्त ४६ ग्रॅम सोनेही जप्त केले. जप्त केलेल्या सोन्याची एकूण किंमत २ कोटी २४ लाख ८६२ रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. फिर्यादी मोहम्मद तौफीक रज्जाक खान (वय ३६, रा. रविवार पेठ) हे सोन्याचे दागिने बनविण्याचा व्यवसाय करतात. (Pune News)
विविध सराफ त्यांच्याकडे दागिने बनविण्यासाठी देतात. १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ ते रात्री ८.१५ या वेळेत ते आणि त्यांची पत्नी घरी नसताना अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. (Pune News)
त्यानंतर लोखंडी कपाटात ठेवलेले दोन किलो २०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि सोन्याची बिस्किटे असा सुमारे दोन कोटी २० लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (अ), ३३१ (३) आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. (Pune News0
सीसीटीव्ही फुटेजमुळे संशयितांचा माग
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सहायक पोलिस आयुक्त सचिन हिरे, परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले तसेच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. (Pune News)
त्यावेळी फिर्यादी राहत असलेल्या इमारतीखाली दोन संशयित व्यक्ती घुटमळताना दिसून आल्या. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे त्यांची ओळख पटवली. मुस्तफा शेख हा भंगार व्यवसाय करतो, तर सरफराज मुस्तफा शेख हा भंगार व्यवसाय करतो, तर सरफराज ऊर्फ आवेज शेख हा चावी बनविण्याचे काम करतो. (Pune News)
हे दोघे काका-पुतणे असून, फिर्यादी राहत असलेल्या इमारतीतच राहत असल्याची माहिती तपासात समोर आली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. पोलिसांच्या तपासानुसार, दोघांनी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. (Pune News)
चोरीच्या मुद्देमालासह अतिरिक्त सोनेही जप्त
पोलिसांनी पंचनाम्याद्वारे आरोपींकडून चोरीस गेलेले दोन किलो २०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि सोन्याची बिस्किटे हस्तगत केली. याशिवाय अतिरिक्त ४६ ग्रॅम सोनेही जप्त करण्यात आले. त्यामुळे चोरीस गेलेल्या मुद्देमालापेक्षा अधिक सोने पोलिसांच्या हाती लागले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खडक पोलिस करीत आहेत. (Pune News)
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले आणि सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. (Pune News)
खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे, शर्मिला सुतार, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे, राहुल मखरे, दाढे, खाडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक संतोष मोहिते, विनोद शिंदे तसेच पोलीस कर्मचारी हेमंत पेरणे, अमित जमदाडे, मयूर भोसले, विकास पांडोळे, निलेश साबळे, सैफ नदाफ, उमेश मठपती आणि कुडले यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास खडक पोलीस करीत आहेत. (Pune News)





