Pune News : सायबर सुरक्षेसाठी ‘थिंक बिफोर क्लिक, व्हेरिफाय बिफोर ट्रस्ट’चा अवलंब करा; पोलीस निरीक्षक राकेश कदम
Pune News : इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे माहिती व सेवा सहज उपलब्ध होत असल्या तरी त्याच्या निष्काळजी वापरामुळे सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे.

Pune News : इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे माहिती, सेवा आणि संवादाची साधने सहज उपलब्ध झाली असली, तरी त्याचा निष्काळजीपणे वापर केल्यास सायबर गुन्ह्यांना बळी पडण्याची शक्यता असते. (Pune News )
कोणतीही लिंक, अॅप किंवा एपीके फाइल उघडण्यापूर्वी विचार करणे, मिळालेली माहिती विश्वास ठेवण्यापूर्वी पडताळून पाहणे आणि ऑनलाइन व्यवहार करताना सतर्क राहणे या तीन बाबी प्रत्येकाने लक्षात ठेवाव्यात, असे मार्गदर्शन लोहगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश कदम यांनी केले. (Pune News )
पुणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत अष्टविनायक मित्र मंडळ, आनंदनगर, धानोरी येथे आयोजित सायबर जनजागृती कार्यक्रमात ते नागरिकांशी संवाद साधत होते. मंडळाचे अध्यक्ष शुभम रासकर यावेळी उपस्थित होते. (Pune News )
इंटरनेट आणि सोशल मीडियाचा योग्य वापर केल्यास ज्ञान, माहिती आणि विविध सेवा सहज उपलब्ध होतात. मात्र आकर्षक संदेश, खोटी माहिती, अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या लिंक, बनावट ऑफर किंवा फाइलच्या माध्यमातून नागरिकांना सायबर गुन्ह्यांमध्ये अडकवले जाऊ शकते. (Pune News )
त्यामुळे कोणतीही लिंक अथवा फाइल उघडण्यापूर्वी ती नेमकी कुठून आली आहे आणि ती आपल्यासाठी आवश्यक आहे का, याची खात्री करावी, असे कदम यांनी सांगितले. (Pune News )
‘थिंक बिफोर क्लिक’ हा सायबर सुरक्षेचा पहिला महत्त्वाचा नियम आहे. अनोळखी क्रमांकावरून आलेली एपीके फाइल, लिंक किंवा संदेश तात्काळ उघडू नये. उदाहरणार्थ, वाहतूक दंडाच्या नावाखाली आलेली एपीके फाइल अधिकृत सरकारी स्रोताकडून आली आहे का, याची खात्री केल्याशिवाय ती डाउनलोड करू नये. कोणताही मोबाईल किंवा अँटीव्हायरस शंभर टक्के सुरक्षिततेची हमी देत नाही, त्यामुळे वापरकर्त्याची स्वतःची सतर्कता महत्त्वाची आहे. (Pune News )
‘व्हेरिफाय बिफोर ट्रस्ट’ या दुसऱ्या नियमाचे पालन करताना अनोळखी व्यक्तींकडून येणाऱ्या आकर्षक ऑफर, गुंतवणुकीत मोठा परतावा, कमी किमतीत महाग वस्तू किंवा पैसे दुप्पट करण्याच्या आमिषांकडे संशयाने पाहावे. अवास्तव वाटणारी कोणतीही ऑफर स्वीकारण्यापूर्वी तिची अधिकृत स्रोताकडून पडताळणी करावी. केवळ आकर्षक संदेश पाहून त्यावर विश्वास ठेवू नये. (Pune News )
तिसरा नियम म्हणजे ‘अलर्ट ऑन ऑनलाइन’ ऑनलाइन असताना आवश्यक तेवढाच इंटरनेट व सोशल मीडियाचा वापर करावा. अनावश्यक संकेतस्थळे, संशयास्पद अॅप्स आणि अनोळखी दुवे यांपासून दूर राहावे. विशेषतः लहान मुले आणि तरुणांच्या ऑनलाइन वापराबाबत पालकांनी जागरूक राहून त्यांना सुरक्षित इंटरनेट वापराचे महत्त्व समजावून सांगावे, असेही त्यांनी नमूद केले. (Pune News )
सायबर गुन्हा घडल्यानंतर लाज, भीती किंवा बदनामीच्या विचाराने तो लपवून ठेवू नये. चूक झाली असल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा आणि सायबर गुन्ह्यांसाठी १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर माहिती द्यावी. आर्थिक फसवणूक झाल्यास जितक्या लवकर तक्रार केली जाईल, तितक्या लवकर पुढील कार्यवाहीची शक्यता वाढते, असे श्री. कदम यांनी सांगितले. (Pune News )
सायबर सुरक्षेसाठी तंत्रज्ञानापेक्षा वापरकर्त्याची जागरूकता आणि सतर्कता महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने ‘थिंक बिफोर क्लिक, व्हेरिफाय बिफोर ट्रस्ट आणि अलर्ट ऑन ऑनलाइन’ हे तीन नियम आपल्या दैनंदिन इंटरनेट वापराचा भाग बनवावेत, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक दिनेश राऊत, पोलिस शिपाई बाजीराव वीर, मंडळाचे उपाध्यक्ष सिद्धांत जवारे, कार्याध्यक्ष रोहन चटीयार उपस्थित होते. (Pune News)
Pune News : तळेगाव ढमढेरे आठवडे बाजारात पाणीच पाणी; व्यापारी, ग्राहकांची उडाली धांदल




