Pune : कर्नाटक हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात

पुणे : रत्नागिरीचा हापूसचा हंगाम तर संपलाच आहे. त्यानंतर आता कर्नाटक हापूसचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे. येत्या पंधरा दिवसांत हा हंगाम संपणार असून, पावसाने उघडीप दिल्यामुळे कर्नाटक हापूसला ग्राहकांकडून चांगली मागणी होत असल्याची माहिती व्यापारी रोहन उरसळ यांनी दिली.
कोकणातील हापूस प्रमाणेच कर्नाटकांतील आंब्याच्या झाडांना हवामान बदलाचा फटका बसला. त्यामुळे फळधारणा कमी होती. त्यामुळे या वेळी कर्नाटक हापूसचा हंगाम उशिराने सुरू झाला होता. एप्रिल महिन्यापर्यंत आवक मर्यादित होती. मात्र, मे महिन्यात मोठ्या प्रमाणात आवक वाढली. त्यानंतर पावसाला सुरुवात झाल्याने या आंब्याला पावसाचा मोठा फटका बसला. पावसामुळे मागणी कमी झाली, तसेच दरही कमी झाले.
त्यामुळे त्याचा आर्थिक फटका शेतकर्यांसह व्यापार्यांनाही सहन करावा लागला. कर्नाटक येथील टुकमुर या भागातून हापूसची आवक होत आहे. येथील फळ विभागात दररोज १० हजार लाकडी पेट्यांची, तर ३ ते ४ हजार दोन डझनाच्या बॉक्सची आवक होत आहे. मे महिन्यात कर्नाटक हापूसची आवक २५ हजार पेट्यांपर्यंत गेली होती.
हवामान बदलाचा फटका बसल्यामुळे हंगाम वाईट गेल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. मागील काही दिवसांत आंब्याला मागणी नव्हती. मात्र, पावसाने उघडीप दिल्यानंतर आता मागणी वाढली आहे.
– रोहन उरसळ, कर्नाटक आंब्याचे व्यापारी
घाऊक बाजारातील आंब्यांचे दर (रुपयांमध्ये)
हापूस ३ ते ४ डझन ८०० ते १२००
पायरी ४ डझन ६०० ते ८००
लालबाग १ किलो २५ ते ३५
बदाम १ किलो २५ ते ३५




