पुणे : नालेसफाईला 15 जून ‘डेडलाइन’

पुणे – पावसाळापूर्व नाले सफाई कामांची जबाबदारी आता तीन अतिरिक्त आयुक्तांवर निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांनी कामांची प्रत्यक्ष पाहणी करायची आहे. ही सर्व कामे 15 जूनपर्यंत पूर्ण करायची आहेत. अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, डॉ. कुणाल खेमनार तसेच विलास कानडे यांच्यावर ही जबाबदारी आहे. महापालिकेने पहिल्यांदाच ही जबाबदारी निश्चित केली आहे.
शहरात गेल्या काही वर्षांत कोट्यवधींची पावसाळापूर्व कामे करूनही नालेसफाई योग्य पद्धतीने होत नव्हती. त्याचा प्रत्यय अचानक मोठा पाऊस झाल्यास शहरात पूरस्थिती निर्माण होते. महापालिका दरवर्षी या कामांच्या निविदा काढते. पण, त्याकडे दुर्लक्ष होते. दरवर्षी ही कामे अर्धवटच राहतात. त्यामुळे महापालिका प्रशासनाला टीकेचा सामना करावा लागतो. त्यामुळे यंदा प्रशासनाने या कामासाठी आधीच नियोजन केले असून कामे सुरूही करण्यात आली आहे. यापूर्वी पूरस्थिती उद्भवलेल्या नाले तसेच ठिकाणांची यादीच तयार केली असून, यंदा तशी स्थिती उद्भवणार नाही यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत.





