पुणे : जम्बो आणि बाणेर कोविड रुग्णालय बंद

पुणे –करोनाच्या पहिल्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढल्याने ऑगस्ट 2020 मध्ये शिवाजीनगर येथील सीओईपीच्या मैदानावर सुरू केलेल्या जम्बो कोविड हॉस्पिटलची आवराआवर सुरू झाली आहे. याशिवाय, बाणेर येथील करोना स्पेशल रुग्णालयही मंगळवारपासून बंद केले आहे. स्वॅब टेस्टिंगसाठी शाळा आणि सार्वजनिक सभागृहांच्या आवारात उभारलेले मंडपही काढून टाकले आहेत.
पहिल्या लाटेवेळी आरोग्य यंत्रणा तोकडी पडल्याने खासगी रुग्णालयांची मदत तर घेतलीच परंतु राज्य सरकार आणि महापालिकेने शिवाजीनगर येथील सीओईपी मैदानावर 800 ऑक्सीजन आणि व्हेंटीलेटर बेडचे तात्पुरते परंतु अत्याधुनिक सोयीसुविधा असलेले जम्बो हॉस्पिटल उभारले.
या जम्बो हॉस्पीटलचा प्रवासही पहिल्या पंधरवड्यात तितकासा सुकर राहिला नाही. परंतु, उपचार आणि व्यवस्थापनासाठी पहिल्यांदा नेमलेल्या लाइफलाइन या संस्थेला तत्काळ बाहेरचा रस्ता दाखवून नवीन संस्था नेमली. पहिल्यापेक्षा दुसऱ्या लाटेत जम्बो हॉस्पीटलचा चांगला उपयोग झाला. याचदरम्यान महापालिकेने आर सेव्हनअंतर्गत ताब्यात आलेल्या बाणेर येथील तयार इमारतीमध्ये सीएसआरच्या माध्यमातून अद्ययावत 350 बेडचे कोविड हॉस्पीटल विक्रमी वेळेत उभारले. तसेच, महापालिकेच्या दळवी, लायगुडे, नायडू या रुग्णालयांतील बेडची क्षमताही वाढवण्याबरोबरच ई.एस.आय, गणेश कला क्रीडा मंच येथेही तात्पुरती विलगीकरणाची सुविधा निर्माण केली.





