Pune : जायका प्रकल्प रखडणार..

पुणे – मुळा मुठा शुद्धीकरण प्रकल्प (जायका) अंतर्गत शहरात निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी नवे ११ प्रकल्प उभारण्यात येत आहेत. या प्रकल्पांचे काम ८० टक्के पूर्ण झालेले असतानाच या सांडपाणी प्रकल्पात पाणी वाहून घेऊन जाण्यासाठी ४९ किलोमीटरची ट्रंक लाइन टाकण्यात येणार होती.
मात्र, मागील पाच वर्षांत केवळ ९ किलोमीटरची ट्रंक लाइन टाकली आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होत असतानाच या ट्रंकलाइन जोडल्या न गेल्यास प्रकल्पच सुरू करणे शक्य नसल्याचे समोर आले आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शुक्रवारी या प्रकल्पाबाबत आढावा बैठक घेतली. तेव्हा हा प्रकार समोर आल्यानंतर आयुक्तांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून तातडीने हे काम पूर्ण करण्याचे आदेश संबंधित ठेकेदारास दिले आहेत.
या प्रकल्पाअंतर्गत (जायका) १४७२ कोटी रुपये खर्च करू ३९६ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. हे काम मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित आहे; पण भूसंपादनातील अडथळ्यांमुळे अनेक ठिकाणी कामे सुरू करता आलेले नाहीत. अखेर जागा ताब्यात आल्यानंतर ११ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांपैकी १० ठिकाणी काम सुरू केले आहे. त्यांचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत दिली आहे.
४९ किलोमीटर ट्रंकलाइन
शहरात सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे जुने १० प्रकल्प आहेत. त्यासोबतच आता हे नवीन ११ प्रकल्प असणार आहेत. त्यामुळे शहरातील १०० टक्के सांडपाणी शुद्ध करण्यासाठी हे नवीन प्रकल्प आहेत. प्रकल्प आराखड्यानुसार नदीत येणारे नाले, तसेच ओढ्यांमध्ये जाणारे सांडपाणी १०० टक्के संकलित करून ते नंतर नदीकाठच्या बाजूने मोठ्या आकाराच्या सांडपाणी वाहिन्या (ट्रंकलाइन) द्वारे प्रकल्पांपर्यंत नेले जाणार आहे.
त्यासाठी एकूण ४९ किलोमीटर मोठ्या आकाराच्या ट्रंकलाइनचे जाळे नदीकाठच्या भागात विकसित केले जाणार आहे. मात्र, प्रकल्पाचे काम सुरू झाल्यापासून केवळ ९ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून, अद्याप ४१ किलोमीटरचे काम बाकी आहे. हे काम होण्यासाठी मोठा कालावधी जाण्याची शक्यता आहे.
काहीही करून काम पूर्ण करा – आयुक्त
या बैठकीत ट्रंकलाइनचे काम का रखडले, असा थेट सवाल आयुक्तांनी केला. या वेळी काम दिलेल्या ठेकेदाराने नदीपात्रात हार्ड राॅक करून तो ब्लास्टिंग करूनच फोडणे शक्य असल्याचे सांगितले. या प्रकल्पासाठी निधी दिलेल्या जायका कंपनीकडून या कामात कुठेही ब्लास्टिंग न करण्याची अट असल्याचे सांगण्यात आले. मात्र, याच कंपनीने अहमदाबाद येथेही अशाच प्रकारे काम केले असल्याने मला काही सांगू नका, काम पूर्ण करणे तुमची जबाबदारी आहे. काहीही करा; पण काम पूर्ण करा, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.





