Pune : ठरलं… ! आठवडाभरात खुला होणार उड्डाणपूल; सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फुटणार

पुणे – सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून बांधण्यात आलेल्या राजाराम पूल ते फनटाइमपर्यंतचा उड्डाणपूल ( Sinhagad Road Flyover ) अखेर पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. या पुलाच्या कामाची पाहणी महापालिका आयुक्त डाॅ. राजेंद्र भोसले यांनी नुकतीच केली आहे.
२७ एप्रिल रोजी पूल सुरू करण्याचे नियोजन असल्याने त्यापूर्वी काम संपविण्याच्या सूचनाही आयुक्तांकडून महापालिका प्रशासनास करण्यात आल्या आहेत. शहरातील सर्वाधिक लांबीचा हा उड्डाणपूल असणार आहे.
सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून राजाराम पूल ते फनटाइमपर्यंत उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. त्यात फनटाइम ते विठ्ठलवाडी आणि राजाराम पूल ते फनटाइम असा दोन्ही बाजूचा उड्डाणपूल आहे.
राजाराम पूल चौकात स्वारगेटकडे जाणाऱ्या दिशेला एक पूल बांधण्यात आला आहे. त्यातील राजाराम पूल चौकातील उड्डाणपूल मागील वर्षी मार्च महिन्यात सुरू झाला आहे, तर आता फनटाइमकडे जाणाऱ्या २१२० मीटर लांबीच्या उड्डाण पुलाचे १०० टक्के काम पूर्ण झाले आहे.
पुलावर पथदिवे व दिशादर्शक फलक बसविणे हे काम शिल्लक आहे. त्यामुळे तातडीने हा पूल सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानंतर आयुक्तांकडे याबाबत विचारणा केली असता, मागील आठवड्यात त्यांनी काम पूर्ण झाले आहे किंवा नाही, याची आपण स्वत: पाहणी करणार असल्याचे सांगितले होते.
त्यानुसार आयुक्तांनी शनिवारी या पुलाच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी महापालिका अधिकारी आणि संबंधित पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदारास उर्वरीत कामे ८ दिवसांच्या आत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
येत्या २७ एप्रिल रोजी उड्डाण पुलाचे उद्घाटन करण्याचे नियोजन असल्याचे या वेळी आयुक्तांकडून अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. त्यानुसार पूलाचे काम पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात आली असून, २६ एप्रिलपूर्वी सर्व कामे पूर्ण केली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.





