पुणे – महापालिकेला शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी सद्यस्थितीत २१ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, भामा- आसखेड आणि खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातून महापालिकेस २०३२ पर्यंत १६.३६ टीएमसी पाणीसाठा मंजूर आहे. त्यामुळे, आधीच शहरासाठी वाढीव पाणी घेताना महापालिका दंड भरून पाणी घेत आहे. त्यामुळे, महापालिकेच्या हद्दीजवळील ५ कि.मी.च्या अंतरातील गावांना महापालिकेस पाणी देणे शक्य नसल्याचे पत्र महापालिका प्रशासनाकडून पीएमआरडीएला देण्यात आले आहे. पीएमआरडीए आयुक्तांकडून मागील महिन्यांत कार्यालयीन परिपत्रक काढत ५ कि.मी. पर्यंतच्या गावांना महापालिकेने पाणी द्यावे. तसेच, २३ गावांमधील नवीन बांधकामांना परवानगी देण्यापूर्वी या गावांमध्ये महापालिकेच्या पाणी योजनेचे काम सुरू असल्याबाबत अभिप्राय घ्यावा त्यानंतरच व्यावसायिक तसेच निवासी बांधकामांना परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. ५१ गावांचा समावेश… पीएमआरडीए कडून महापालिका हद्दीजवळील पाच कि. मी.च्या हद्दीच्या शासनाच्या जुन्या परिपत्रकाचा आधार घेत काढलेल्या आदेशानुसार, महापालिकेत ३४ गावे समाविष्ट झाल्यानंतर महापालिकेच्या सुधारीत हद्दीजवळील ५१ गावांचा नकाशा देण्यात आला होता. तसेच, गावांची यादी देत त्यांना महापालिकेकडून पाणी द्यावे, असे नमूद केले आहे. मात्र, प्रत्यक्षात २०१७ मध्ये समाविष्ट झालेली ११ गावे आणि २०२१ मध्ये समाविष्ट झालेल्या २३ गावांमध्ये अद्यापही पालिकेला पाणी देता आलेले नाही. १९९९-२००० मध्ये समाविष्ट झालेल्या हद्दवाढीतील २३ गावांनाही अद्याप पालिकेकडून पाणी पुरवठा केला जात नाही. महापालिकेलाच हवे २६ टीएमसी पाणी… महापालिकेसाठी पाटबंधारे विभागाने २०३२ पर्यंतच्या लोकसंख्येसाठी १६.३६ टीएमसी साठा राखीव केला आहे. महापालिकेची जुनी ह्द्द व नवीन समाविष्ट गावे पाहता महापालिकेस प्रत्यक्षात २४ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. २०३७ पर्यंत २६ टीएमसी पाण्याची गरज आहे. तर, पीएमआरडीच्या टीपी स्कीमसाठीही पाणी लागणार आहे. त्यामुळे वाढीव पाणीकोटा मिळाल्याशिवाय, महापालिकेस पाणी देता येणार नाही. तसेच नव्याने समाविष्ट २३ गावांमधील ५ गावांसाठी पाणी योजनांचे काम सुरू असून ते पूर्ण होण्यास दोन ते तीन वर्षांचा कालावधी जाणार आहे. त्यामुळे त्यांना किती पाणी लागेल हे अद्याप निश्चित नाही. तसेच, पाच कि.मी.च्या आदेशाप्रमाणे वाढीव पाणी कोटा मंजूर करून घेणे आवश्यक असल्याने कोटा मंजूर झाल्याशिवाय पाणी देता येणार नाही.