Pune: भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाची आज पाहणी

पुणे – महापालिकेकडून भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येत आहे. याशिवाय महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचे विस्तारीकरण केले जाणार आहे. या दोन्ही कामांची पाहणी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ उद्या (गुरुवार) करणार आहेत.
महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणाबाबत भुजबळ यांनी काही महिन्यांपूर्वी महापालिका प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पहिल्यांदाच ते या दोन्ही ठिकाणी भेट देणार असून, याप्रकरणी बैठकही घेण्याची शक्यता आहे.
या दोन वास्तू एकत्रित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दोन्ही स्मारकांना जोडणाऱ्या जागा ताब्यात घेण्यासाठी पालिका प्रयत्नशील असून, जागांच्या मोबदल्यासाठीचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यात तब्बल ८५ टक्के जागा मालकांनी रोख रकमेऐवजी घराची मागणी केली आहे.
विशेष म्हणजे एकाच जागेसाठी भाडेकरू, जागा मालक दोघांनाही घर हवे आहे. शासनाने गेल्या वर्षी कामाला गती देण्यासाठी २०० कोटींचा निधी मंजूर केला. मात्र, त्यानंतरही काहीच हालचाल झाली नसल्याने काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली होती.
त्यानंतर स्मारकाच्या भूसंपादनासाठी स्वतंत्र उपायुक्तांची नेमणूक झाली. त्यानुसार स्वतंत्र चार पथके तयार करून, बाधितांना मोबदला कसा हवा आहे, याचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. त्यानुसार स्मारकासाठी एकूण ११९ सर्व्हे आहेत. त्यामध्ये ३५८ जागा मालक, ६२४ भाडेकरू आणि सुमारे २५ झोपड्यांसह एकूण ९८२ बाधितांचा समावेश आहे.
८० टक्के भाडेकरू आणि ८० टक्के जागा मालकांनी घराच्या मोबदल्यात घराची मागणी केली आहे. परिणामी, महापालिकेस धोरणात्मक निर्णय घेऊन यावर तोडगा काढावा लागणार असून, त्याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.





