पुणे : भारतीय लांडग्यांचा वंश सर्वांत प्राचीन!

पुणे- (गायत्री वाजपेयी) आशिया खंडातील लांडग्यांच्या इतर प्रजातींपेक्षा या प्राण्याची भारतीय प्रजाती पूर्णपणे वेगळी आहे. शिवाय, ती जिवंत वंशाचे प्रतिनिधित्व करणारी सर्वांत प्राचीन प्रजाती असल्याचे लांडग्यांच्या जिनोम सिक्वेन्सिंग अभ्यासातून समोर आले आहे. पण, ही महत्त्वपूर्ण प्रजाती सध्या लुप्त होण्याच्या मार्गावर असून, ती “अतिशय धोकादायक’ अवस्थेत असल्याचा निष्कर्षही अभ्यासात मांडण्यात आला आहे.
कॅलिफोर्निया विद्यापीठ, डेव्हिस आणि शास्त्रज्ञांनी पुणे जिल्ह्यातील सासवड आणि मुर्टी या परिसरांतील लांडग्यांचा अभ्यास केला. सुमारे तीन वर्षांपासून हा अभ्यास सुरू होता. त्याच्या आधारावर मॉलेक्युलर इकोलॉजी जर्नलमध्ये यासंदर्भात शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. यात “भारतीय लांडगा जगातील सर्वांत धोकादायक स्थितीत आहे,’ असा निष्कर्ष मांडण्यात आला आहे. या जिनोम सिक्वेन्सिंग अभ्यासाअंतर्गत लेखकांनी चार भारतीय आणि दोन तिबेटी लांडग्यांच्या जिनोमच्या अनुक्रमाचा अभ्यास केला.
त्यांच्या उत्क्रांती आणि फायलोजेनोमिक इतिहासाचाही त्यात मुद्दा समाविष्ट करण्यात आला आहे. “ही एक वैशिष्ट्यपूर्ण प्रजाती असल्याने, भारतीय आणि तिबेटी लांडग्यांना उत्क्रांतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण एकके म्हणून ओळखले जावे,’ अशी शिफारस या अभ्यासाद्वारे करण्यात आली आहे.
जैवविविधताही धोक्यात
लांडग्यांचा मुख्य अधिवास प्रामुख्याने गवताळ प्रदेशात असतो. मात्र, पुण्यासह देशभरात बहुतांश ठिकाणी विकासाच्या नावावर गवताळ प्रदेशात अतिक्रमणे होत आहेत. गवताळ प्रदेश नष्ट होत असल्याने त्यावर आधारित जैवविविधताही धोक्यात आली आहे. त्यामुळेच भारतीय लांडगे हे लुप्तप्राय होण्याच्या मार्गावर आहेत. इतकेच नव्हे, तर पूर्वी ओळखल्या गेलेल्यांपेक्षा अधिक जास्त प्रमाणात हा जीव धोक्यात आहे. त्याकडे तत्परतेने लक्ष न दिल्यास हा जैविक वारसा नामशेष होण्याचे संकटदेखील अधिक गडद आहे.
गवताळ प्रदेश ही एक स्वतंत्र परिसंस्था आहे. त्यामुळे वनांसह या प्रदेशाचेही संरक्षण गरजेचे आहे. यासंदर्भात आम्ही संस्थेच्या माध्यमातून सातत्याने काम करत असतो. गवताळ प्रदेश आणि जैवविविधतेबाबत विविध अभ्यासनाही आमचा सक्रिय पाठिंबा असतो.
– मिहीर गोडबोले,
दी ग्रासलॅंड ट्रस्ट
भारतीय लांडगे आणि पश्चिम आशियाई लांडगे ही एकच प्रजाती असल्याचे सध्या मानले जाते. मात्र, या सर्व प्रजाती भिन्न असून, तिबेटीयन आणि भारतीय लांडगे अधिक वैशिष्ट्यपूर्ण आहेत. भारतात लांडगा हा युरोपातून हिमालयमार्गे दक्षिणेकडे आल्याचे समजले जाते; परंतु जिनोम सिक्वेन्सिंग अभ्यासातून भारतीय लांडगा ही प्रजाती अधिक पुरातन असून, ती दक्षिणेतून उत्तरेकडे गेल्याचे सिद्ध होत आहे. जगात अस्तित्वात असलेल्या लांडग्यांच्या प्रजातींमधील सर्वात जुन्या वंशाची अस्तित्वात असलेली ही प्रजाती असल्याने भारतीय लांडग्यांना सर्वाधिक महत्व प्राप्त होते.
– डॉ. बिलाल हबीब, वन्यजीव अभ्यासक, वाइल्ड इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया





