पुणे : समाविष्ट गावांतून होणार मिळकत कर आकारणी

पुणे- महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांमध्ये आगामी आर्थिक वर्षापासून (2022-23) मिळकत कर आकारणी करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, यापूर्वी महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट गावांसाठी मिळकत कर आकारणी करण्यासाठी धोरण आणि कार्यपद्धती ठरविण्यात आली होती. 1997 साली समावेश झालेल्या गावांना “ज्या सालचे घर, त्या सालचा कर’ असा नियम लावण्यात आला होता. त्यानंतर 2012मध्ये येवलेवाडी आणि 2017 मध्ये समाविष्ट अकरा गावांसाठी मुख्यसभेने दिलेल्या मान्यतेनुसार कर आकारणी करण्यात आली. या वर्षी 30 जून रोजी नवीन गावांचा महापालिकेत समावेश करण्यात आला. या गावांमध्ये पुढील आर्थिक वर्षांपासून कर आकारणी करण्यात येणार आहे.
या ग्रामपंचायतींमध्ये नोंद असलेल्या मिळकतींवर कर आकारण्यात येणार आहे. त्यासाठी 2022-23 हे पहिले वर्ष मानण्यात येणार आहे. महापालिकेच्या मुख्यसभेने मान्य केलेल्या दरानुसार सर्वसाधारण कर आणि इतर सेवाकरांच्या एकत्रित बेरजेतून ग्रामपंचायत सर्वसाधारण कराची रक्कम वजा करून पहिल्या वर्षी उर्वरित रकमेच्या 20 टक्के, दुसऱ्या वर्षी 20 टक्के, तिसऱ्या वर्षी 20 टक्के, चौथ्या वर्षी 20 टक्के आणि पाचव्या वर्षी म्हणजेच 2026-27 या आर्थिक वर्षात शंभर टक्के कराची आकारणी करण्यात येणार आहे. त्या पुढील कालावधीसाठी महापालिकेने सुचविल्याप्रमाणे करांची वसुली करण्यात येणार आहे.





