Pune : मिळकतकर विभागाचा ‘सर्व्हर डाउन’

पुणे – सवलतीत मिळकतकर भरण्याच्या शेवटच्या दिवशी नागरिकांनी महापालिकेच्या कर संकलन केंद्रावर मोठ्या प्रमाणात रांगा लावल्या होत्या. त्यातच अनेकांनी कर भरण्यासाठी सकाळपासूनच ऑनलाइन सेवा वापरण्यास सेवा सुरू केल्याने कर संकलन विभागाचा सर्व्हर डाउन झाला. त्यामुळे, अनेक ठिकाणी पुणेकरांना तासंतास ताटकळत राहावे लागल्याचे पाहायला मिळाले.
जवळपास दिवसभर हा गोंधळ झाल्याने अखेर महापालिका प्रशासनाने रात्री उशीरा सवलतीत कर भरण्यासाठी आणखी दहा दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे, पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.
शहरातील नागरिकांना दरवर्षी १ एप्रिलपासून मिळकतकराच्या बिलांचे वाटप केले जाते. मात्र, मागील वर्षी महापालिकेच्या पीटी ३ अर्जाचा गोंधळ झाल्याने या वर्षी १ मे पासून बिले देण्यात आली आहेत. त्यानंतर पालिकेकडून पुढील दोन महिने नागारिकांना कर भरण्यासाठी सर्वसाधारण करात ५ ते १० टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे या दोन महिन्यांत नागरिक मोठ्या प्रमाणात कर भरतात.
यंदा ही सवलत १ मे ते ३० जून देण्यात आली होती. त्यानुसार महापालिकेने बिले पाठविलेल्या सुमारे १४ लाख मिळकतधारकांपैकी जवळपास सात लाख दहा हजार मिळकतधारकांनी १२४४ कोटी कोटींचा कर पालिकेच्या तिजोरीत जमा केला आहे.
यंत्रणेचा गोंधळ
सवलतीत कर भरण्याची मुदत संपत असल्याने महापालिकेने शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी करभरणा केंद्रे सुरूच ठेवली होती. मात्र, अनेक नागरिकांनी सोमवारी पालिकेची सर्वच कर संकलन केंद्रे व नागरी सुविधा केंद्रांवर गर्दी केली. त्याच वेळी ऑनलाइन कर भरणाऱ्यांची संख्याही वाढल्याने पालिकेच्या सर्व्हरवर अचानक लोड आल्याने वारंवार सर्व्हर डाउन होण्याचे प्रकार वाढले.
परिणामी करभरणा यंत्रणाच कोलमडून पडल्याने नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली. ही बाब लक्षात आल्यानंतर प्रशासनाने तातडीने सर्व्हर दुरुस्तीसाठी प्रयत्न केले असले, तरी फारसा फरक न पडल्याने व नागरिकांच्या रांगा वाढत असल्याने प्रशासनानेच दोन तास सर्व्हर बंद करत ऑफलाइन कर स्वीकारला. मात्र, त्यामुळे गोंधळात आणखीनच भर पडली.
दहा दिवस मुदतवाढ
महापालिका प्रशासनाकडून या वर्षी मिळकतकराची बिले उशिरा दिल्याने सवलतीत कर भरण्यासाठी १५ दिवसांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, दिलेली मुदत पुरेशी असल्याचे सांगत अतिरिक्त आयुक्तांनी त्यास नकार दिला होता. मात्र, सोमवारी शेवटच्या दिवशी सकाळपासूनच सर्व्हर डाउन झाल्याने नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन कर संकलन विभागाकडून दुपारी पुन्हा याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना देण्यात आली. त्यानंतर प्रशासनाने दिवसभराच्या उत्पन्नाचा आढावा घेत रात्री उशिरा दहा दिवसांची मुदतवाढ दिली असून, आता नागरिकांना १० जुलै पर्यंत सवलतीसह कर भरता येणार आहे.





