पुणे – गेल्या काही वर्षांपासून कोंढवा, येवलेवाडी आणि पिसोळी परिसरात अनधिकृत प्लॉटिंग आणि त्यावरील बांधकामांचे प्रकार मोठया प्रमाणात वाढले आहेत. अशा बांधकामांवर पालिकेने कारवाई केल्यानंतर नागरिकांना संबधित जागा अथवा बांधकाम आरक्षित असल्याचे लक्षात येते. मात्र, तोपर्यंत त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले असते. त्यामुळे नागारिकांनी अशा बेकायदेशीर प्लॉटिंगपासून दूर राहावे आणि आपली फसवणूक टाळावी असे आवाहन पालिकेने केले आहे. शहर अभियंता कार्यालयाच्या निवेदनानुसार, हवेली तालुक्यातील कोंढवा, येवलेवाडी व पिसोळी भागात हिलटॉप, हिलस्लोप आरक्षित जागांवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत प्लॉटिंग सुरू आहे. या प्लॉटिंगमध्ये जमीन विकसन करून बेकायदेशीररीत्या भूखंड विक्री केली जात आहे. महापालिकेच्या बांधकाम विकास विभागामार्फत अशा अनधिकृत बांधकामांवर वेळोवेळी कारवाई केली जाते. मात्र, अनेक वेळा नागरिक अनधिकृत जागा विकत घेतात आणि त्यानंतर त्यांना कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागते. कोणतीही जमीन खरेदी करण्यापूर्वी ती कायदेशीर आहे का, याची खातरजमा करावी. अनधिकृत प्लॉटिंग किंवा बांधकाम खरेदी केल्यास भविष्यात मोठी आर्थिक फसवणूक होऊ शकते, असा इशारा पालिकेने दिला आहे. नागरिकांनी अशा प्रकारांपासून सावध राहावे आणि अधिकृत दस्तऐवजांची पडताळणी करूनच व्यवहार करावे असेही आवाहन केले आहे. आयुष्यची कमाई मातीमोल या भागात मोठया प्रमाणात अनधिकृत प्लॉटिंग सुरू आहे. त्याबाबत, फसव्या जाहिराती करून सामान्यांना या जमिनी अथवा विनापरवानगी बांधलेली घरे स्वस्तात विकली जातात. परिणामी, अनेकजण आसपासच्या जागा अथवा घरांपेक्षा ही घरे स्वस्तात मिळत असल्याने पैसे वाचविण्याच्या नादात घरे अथवा जागा खरेदी करतात. जागेवर बांधकाम केल्यानंतर अथवा इमारत पूर्ण झाल्यानंतर संबधित जागा आरक्षित असल्याच्या अथवा बांधकाम अनधिकृत असल्याच्या नोटीसा येतात. नंतर कारवाई झाल्यावर सामान्य नागरिकांनी कमावलेली आयुष्याची कमाई क्षणात मातीमोल होते. त्यामुळे, असे व्यवहार करण्यापूर्वी संबधित यंत्रणांकडून माहिती घेऊन तसेच खातरजमा करूनच व्यवहार करावेत असे आवाहन पालिकेने केले आहे.