PUNE: मार्केट यार्डमध्ये टोमॅटोची मोठी आवक; अपेक्षित मागणी नसल्यामुळे मिळतोय कवडीमोल भाव

पुणे – दोन महिन्यांपूर्वी किरकोळ बाजरात 200 रुपये किलो झालेल्या टोमॅटोची आता कवडीमोल भावाने विक्री होत आहे. भाव वाढल्यामुळे जिल्ह्यासह विभागात टोमॅटोची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. परिणामी, दोन महिन्यापूर्वी 4 ते 5 हजार पेटी आवक होणाऱ्या टोमॅटोची आता 12 ते 13 हजार पेटींवर आवक पोहोचली आहे.
ही आवक दुप्पटीहून जास्त आहे. त्या तुलनेत मागणी कमी असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ आणि अमोल घुले यांनी दिली. टोमॅटोला घाऊक बाजाराता किलोस 5 ते 8 रुपये, तर किरकोळ बाजारात दर्जानुसार 15 ते 25 रुपये भाव मिळत आहे. टोमॅटो सर्वसामान्याच्या आवाक्यात आला आहे. तर दुसरीकडे उत्पादन, वाहतुक खर्च निघत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आहे.
काही महिन्यांपूर्वी टोमॅटोला चांगला भाव मिळत होता. 100 रुपये किलोपर्यंत घाऊक बाजारात भाव पोहोचले होते. परिणामी, शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड जास्त झाली आहे. आता नवीन पिका आल्यानंतर टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्या तुलनेत अपेक्षित मागणी नसल्यामुळे टोमॅटोच्या भावात घाऊक आणि किरकोळ बाजारात घसरण झाल्याची माहिते व्यापारी विलास भुजबळ आणि किरकोळ विक्रेते प्रकाश ढमढेरे यांनी दिली. अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे.
“दोन महिन्यांपूर्वी टॉमॅटोचे भाव तेजीत होते. त्यामुळे जिल्ह्यासह विभागातील शेतकऱ्यांनी टोमॅटोची मोठी लागवड झाली होती. त्याचे पिक आल्यानंतर बाजारात आवक वाढली आहे. त्या तुलनेत मालाला उठाव नाही. त्यामुळे भावात मोठी घसरण झाली आहे. येत्या काही दिवसात हीच परिस्थिती राहण्याचा अंदाज आहे.” – विलास भुजबळ, ज्येष्ठ आडतदार, मार्केट यार्ड.





