Pune: गणेशोत्सवात लाऊडस्पीकर किती वेळ वाजणार? पुणे पोलिसांनी केले स्पष्ट

पुणे – शहरात गणेशेत्सव सुरू झाला आहे, दहा दिवस गणेश भक्तांना भव्यदिव्य देखावे पाहण्यास मिळणार आहेत. या काळात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार ध्वनीक्षेपक वापरण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी कधीपासून कधीपर्यंत लाऊडस्पीकर वाजवता येणार आहे, त्याची माहिती दिली.
गणेशोत्सव काळात दि. 7 ते 12 सप्टेंबरपर्यंत रात्री 10 पर्यंत लाऊडस्पीकर वापरता येणार आहे. त्यानंतर दि. 13 ते 17 पर्यंत म्हणजे पाच दिवस रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे, असे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
शहरात जर काही गँग ऍक्टिव्ह झाल्या असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. मागच्या आठवड्यात काही घटना घडल्या आहेत, त्याबाबत पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. इट का जबाब पथर से. देण्याची क्षमता पुणे पोलिसांची आहे. पोर्शे कार अपघात प्रकरणात पुणे पोलिसांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. मात्र, या घटनेत केलेल्या कारवाईमुळे आरोपीला अद्याप जामीन मिळालेला नाही. गुन्हेगारी पूर्णपणे नेस्तेनाबूत करण्यासाठी पोलीस यंत्रण सज्ज आहेत, ते पोलिसांनी सांगितले.
तीन दिवस दारुबंदी…
गणेशोत्सव काळात सात हजार पोलिसांचा शहरात बंदोबस्त असतााना गणेशोत्सव काळात दि. 7, 16 आणि 17 सप्टेंबरला तीन दिवस शहरात दारू बंदी असणार आहे. पुण्यातील फरासखाना, विश्रामबाग आणि खडक भागात 10 दिवस दारू बंदी करण्याचा प्रस्ताव सरकारकडे देण्यात आला असल्याचे तसेच गणेशोत्सव काळात 756 आरोपीना प्रतिबंधात्मक नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. कोयता मिळणाऱ्या ठिकाणाचा शोध घेऊन त्यावर कारवाई करण्यात येत आहे. अल्पवयीन आरोपींबाबत वेगळा विचार करीत असल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले.
शहरात यावर्षी 3798 मंडळे…
पुणे शहरात यावर्षी 3798 सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. घरगुती गणपतीची संख्या साधारण 6,64,257 इतकी आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 1742 लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. लेझर लाइटला बंदी असणार आहे. 10 क्युआरटी टीम्स तैनात असणार आहेत. सोशल मीडियावर काही आपत्तीजन्य पोस्ट टाकल्यास कारवाई केली जाणार आहे.





