Pune: पत्नी राहत असलेले घर विकू नये; न्यायालयाचा पतीला दणका

पुणे : पत्नी राहत असलेले घर विकण्याची धमकी देणाऱ्या पतीला न्यायालयाने दणका दिला आहे. पत्नीवर घर सोडण्यासाठी दबाव आणू नये, घराबाहेर काढू नये, घर विकू नये, असा आदेश दिला आहे. याबरोबरच पत्नीला दरमहा १० हजार रुपये आणि दोन्ही मुलांना मिळून १० हजार रुपये कायमस्वरूपी पोटगी देण्यात यावी, असेही आदेशात म्हटले आहे.
राजा (वय ४५) आणि राणी (वय ४०) (नाव बदलले आहे) अशी त्या दोघांची नावे आहेत. २००४ मध्ये दोघांचा विवाह झाला. त्यानंतर दांपत्याला २००६ मध्ये मुलगा व २००८ मध्ये मुलगी झाली. दोघेही खासगी नोकरी करतात. सुरळीत संसार सुरू असताना दोघात वाद होऊ लागले. २०१९ मध्ये कोणतीही माहिती न देता पती मुळ गावी सोलापूर जिल्ह्यात निघून गेला. तिकडे नोकरी करू लागला.
मात्र, पत्नी आणि मुलाची कसलीही जबाबदारी त्याने घेतली नाही. याउलट पुण्यात पत्नी राहत असलेले घर पतीच्या नावावर होता. पत्नीला घरातून बाहेर काढण्यासाठी तो फ्लॅट विक्रीचा प्रयत्न करत होता. पत्नीला याची कुणकुण लागली होती. दरम्यान, तिने २०२२ मध्ये कौटुंबिक हिंसाचार कायद्यातंर्गत न्यायालयात दावा दाखल केला.
नोटीस बजावूनही पती न्यायालयात हजर राहिलाच नाही. त्यामुळे अर्जदारांचे वकील ॲड. राहुल जाधव यांनी दाखल केलेले पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने हा निकाल दिला. ॲड. जाधव यांना ॲड. मृदुला शेंद्रे, ॲड. मंजुषा अरूण तंठक यांनी सहकार्य केले.
“पती पत्नीला त्रास देत होता. तिला न्याय मिळवून दिल्याचा आनंद वाटत आहे. न्यायालयाच्या निकालामुळे पतीच्या जाचाला लगाम बसला आहे.” – ॲड. राहुल जाधव, पत्नीचे वकील व कार्यकारिणी सदस्य, दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन, पुणे.





