Pune: मेघगर्जनेसह जोरदार पाऊस बरसणार; बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

पुणे – राज्यात पुढील दोन ते तीन दिवस बहुतांश जिल्ह्यात मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. त्यानंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
कमी दाबाचे क्षेत्र वायव्य बंगालच्या उपसागरालगत आहे. या कमी दाबाच्या क्षेत्रापासून एक द्रोणीय रेषा दक्षिण महाराष्ट्रपर्यंत जात आहे, तर मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या भागावर वाऱ्याची एक चक्रीय स्थिती हवेच्या वरच्या स्थरावर आहे.
त्यानुसार राज्यात पुढील दोन ते तीन दिवस कोकण-गोवा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात बहुतांश, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला असून, बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड येथे तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल. नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यात पुढील दोन ते तीन दिवस हलका ते मध्यम पावसाची शक्यता असून, या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे, तसेच मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत हलका ते मध्यम आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.





