Pune : गट, गण रचनेचा आराखडा जाहीर

पुणे – पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी 73 गट आणि 146 गणांची रचनेचा प्रारूप आराखडा सोमवारी प्रसिद्ध करण्यात आला. त्यानुसार जुन्नर, खेड आणि इंदापूर या तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद सदस्य संख्या प्रत्येकी आठ असणार आहे, तर सर्वांत कमी जिल्हा परिषद सदस्य संख्या राजगड (वेल्हा) तालुक्यात असून, या तालुक्यांत दोन सदस्य असणार आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी गट-गण रचनेची अधिसूचना सोमवारी जारी केली. त्यानंतर तालुक्यातील 13 तहसील कार्यालये, पंचायत समिती कार्यालये आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. या रचनेसाठी 2011ची जनगणना ग्राह्य धरण्यात आली आहे. याबाबत नागरिकांना 21 जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती, सूचना नोंदविता येणार आहे.
हवेली तालुक्यातील सदस्य घटले
जिल्ह्यात 2017 मध्ये जिल्हा परिषद सदस्यांची संख्या 75 होती. 2017 नंतर हवेली आणि मुळशी तालुक्यांतील काही गावांचा समावेश महापालिकेत झाला, तसेच उरुळी देवाची -फुरसुंगी ही नगरपालिका स्थापन झाली. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींचा समावेश पुणे महापालिकेत झाल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य संख्या कमी झाली. हवेली तालुक्यात 2017 मध्ये जिल्हा परिषद सदस्य संख्या13 होती. आता या तालुक्यात जिल्हा परिषद सदस्य 6 असतील, तर जुन्नर, खेड, दौंड, भोर आणि इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषद सदस्य संख्येत एकने वाढ झाली आहे.





