pune gramin : वढूमध्ये बलिदान स्मरणदिन कार्यक्रमाची जय्यत तयारी

कोरेगाव भीमा- श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे (दि. 21) धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या 334 व्या बलिदान स्मरणदिन पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या नियोजन करण्यात आले आहे. यावेळी जय्यत तयारी करण्यात येत आहे.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार उदयनराजे भोसले, खासदार अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, आमदार शिवेंद्रराजे भोसले, युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले, माजी खासदार शिवाजीराव आढळराव, शाहू नगरी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष वृषाली भोसले, आमदार महेश लांडगे, आमदार निलेश लंके,
महाराज छत्र बुंदेल खंड वंशज राजमाता दिलहर कुमारीजी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अखिल भारतीय दहशतवाद विरोधी संघटनेचे अध्यक्ष मनिंदरसिंग बिट्टा आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहे. यावेळी पुणे जिल्ह्यासह राज्यभरातून विविध संघटनांचे पदाधिकारी, शंभूभक्त उपस्थित राहणार आहेत. पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
ऐतिहासिक नाट्यकृती सादर होणार
सकाळी 6 वाजता धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज, कवी कलश व वीर शिवले यांच्या समाधीस महाभिषेक होणार आहे. 7 वाजता मूक पदयात्रा, 8.30 वाजता जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शासकीय पूजा, 9 ते 10. 30 पर्यंत ह. भ. प शिरीष महाराज मोरे, देहुकर यांचे कीर्तन, 11.30 वाजता समाधीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी, 11.45 वाजता गृहविभागातर्फे शासकीय मानवंदना, 12 वाजता सभा व पुरस्कार वितरण, दुपारी पुरंदर ते वढू-तुळापूर पालखीचे आगमन, सायंकाळी 7.30 वाजता ऐतिहासिक नाटक सादर करून कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वतोपरी नियोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान व त्यागास अभिवादन करण्यासाठी सर्व शंभू भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
– सारिका अंकुश शिवले, सरपंच.





