pune gramin : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

वडापुरी – इंदापूर तालुक्यातील 26 ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून प्रचाराच्या धडाडणाऱ्या तोफा शुक्रवारी (दि. 16) बंद होणार आहेत. त्यामुळे जाहीर प्रचारासाठी आता फक्त 1 दिवस मिळणार असल्याने उमेदवार व समर्थकांची चांगलीच दमछाक होत आहे.
प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी पायाला भिंगरी बांधली आहे. गेला आठवडाभर प्रचाराचा धुरळा उडाला आहे. न पोहोचलेल्या मतदारापर्यंत जाण्याचा उमेदवारांचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्यक्ष भेट होत नसेल तर फोन, मेसेजद्वारे मतदारापर्यंत भूमिका पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
इंदापूर तालुक्यात अनेक ठिकाणी दुरंगी तिरंगी लढती होत असून चुरशीची इर्षा पाहायला मिळत आहे. निवडणूक अंतिम टप्प्यात असल्याने सर्वच उमेदवारांसाठी शनिवार (दि. 17) रात्र महत्त्वची असणार आहे. प्रचाराची जाहीर सांगता जरी झाली असली तरी,
उमेदवारांनी गावातील मोठी संख्या असलेल्या कुटुंबांवर गठ्ठा मतदानासाठी लक्ष केंद्रित केले आहे. आता कार्यकर्ते आता मतदार यादीच्या स्लीप वाटपाच्या कामाला लागले असून जास्तीत जास्त मतदाराना केंद्रांपर्यंत आणण्याचे प्रयत्न आतापासूनच सुरू आहेत.
विरोधकांच्या हालचालींवर पाळत.
सायंकाळच्या सत्रात तरुण कार्यकर्ते, उमेदवार व त्यांचे समर्थक प्रचारासाठी मैदानात उतरतात. रात्री दहा वाजेपर्यंत ते प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. रात्री दहानंतर विरोधकांच्या हालचालींवर पाळत ठेवणे सुरू केले आहे. सरपंचपद थेट जनतेतून असल्याने दोन्ही गटात प्रचंड टोकाची ईर्ष्या पहावयास मिळते. शेवटच्या टप्प्यात साम, दाम, दंड याचा वापर करण्यात येत आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.





