Pune Gramin : धक्कादायक! शाळेच्या प्रांगणात गांजाची डील? जुन्नर पोलिसांनी उधळला डाव…
जुन्नर शहरातील बंद स्थितीतील अहिल्यादेवी होळकर शाळा क्रमांक ४ च्या आवारात गांजाची विक्री होणार असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Pune Gramin : जुन्नर शहरातील बंद स्थितीतील अहिल्यादेवी होळकर शाळा क्रमांक ४ च्या आवारात गांजाची विक्री होणार असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
जुन्नर पोलिसांच्या रात्रगस्त पथकाने वेळीच कारवाई करत सुमारे ३ किलो गांजा, एक इनोव्हा कार आणि स्कूटर असा एकूण १० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून दोन संशयित फरार आहेत.
रविवारी (१९ जुलै) मध्यरात्री रात्रगस्तीदरम्यान बंद शाळेच्या मैदानात एक चारचाकी आणि एक दुचाकी संशयास्पदरीत्या उभ्या असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. संशय आल्याने अतिरिक्त पोलिसांना पाचारण करण्यात आले.
त्यानंतर टाकलेल्या छाप्यात इनोव्हा कार आणि स्कूटरची झडती घेतली असता वाहनांमधून एकूण ३.०२८ किलो गांजा जप्त करण्यात आला.
या कारवाईत मयूर संजय खराडे याला अटक करण्यात आली आहे. आरोपींकडे अमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने गांजा बाळगल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून, त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायदा तसेच भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यातील अन्य दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. अटक आरोपीला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.
जिल्ह्यात सुरू असलेल्या अमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत जुन्नर पोलिसांनी ही कारवाई केली असून, बंद शाळेच्या परिसराचा अमली पदार्थांच्या व्यवहारासाठी वापर होत असल्याचा प्रकार समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.





