pune gramin : विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यात सुविधा द्या

कोरेगाव भीमा-कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक मूलभूत सुविधा देण्यात याव्यात, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाला दिले आहे. अभिवादन कार्यक्रम सोहळ्याच्या पूर्वतयारीबाबत विधानभवन येथे आढावा बैठक घेण्यात आली.
त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, राज्यभरातून अनुयायी येत असल्याने पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करावी. पाणी पिण्यासाठी कागदी ग्लासची व्यवस्था करावी. अनुयायांची वाढती संख्या लक्षात घेता त्या प्रमाणात सुविधा निर्माण कराव्यात. लोणीकंद ते डोंगरगाव रस्ता करणे,
पुणे- नगर महामार्ग रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 60 लाख रुपये जिल्हा नियोजन समितीतून देण्यात येतील. सोहळा शांततेत व उत्साहात साजरा करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करीत नियोजनासाठी आवश्यक सर्व निधी शासनातर्फे देण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.
नियोजनाचा आढावा
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले की, विविध पातळ्यांवर बैठका घेण्यात आल्या आहेत. नियोजनाचा वेळोवेळी आढावा घेण्यात येत आहे. करोनानंतर यावर्षी मोठ्या प्रमाणात नागरिक येण्याची शक्यता लक्षात घेता 16 ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. वाढीव बसेस, 1400 तात्पुरती स्वच्छतागृहे, 20 रुग्णवाहिका, आरोग्य पथके, पिण्याच्या पाण्याचे टॅंकर्स, अग्निशमन वाहने आदी व्यवस्था करण्यात येत आहे.





