pune gramin : हिंगेमळ्यात आढळला बिबट्याचा मृत बछडा

मंचर -अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील वरचा हिंगे मळा (घाटी वस्ती) येथील शामकांत नरहरी हिंगे यांच्या शेतातील मक्याच्या पिकात बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळला आहे. बछडा मिळाल्याने मादीला जेरबंद करण्यासाठी या परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
गुरुवारी (दि. 15) सकाळी आठ वाजता शामकांत नरहरी हिंगे मक्याच्या पिकाला पाणी भरण्यासाठी आले असता मका पिकाला पाणी पोहचले किंवा नाही हे पाहण्यासाठी शेतात आले. आत कसला तरी वास आला असता त्यांनी सरीत पाहिले असता बिबट्याचे पिल्लू मृतावस्थेत दिसून आले.
बिबट्याचे पिल्लू या एक दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा अंदाज व्यक्त केला आहे. सहा महिने वयाचा नर जातीचा बिबट्या मृत आढळला आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप रौधळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदिप कासारे वनरक्षक सूर्यकांत कदम, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. येवले, पोलीस पाटील माधुरी जाधव यांनी येऊन मृत बिबट्याची आणि परिसराची पाहणी केली.
वीजपुरवठा दिवसा करावा
या परिसरात वारंवार बिबट्या दिसत आहे. अनेक वेळा प्राण्यावर हल्ला केला आहे. त्यामुळे या भागात पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. शेतकऱ्यांना रात्री अपरात्री शेती पिकांना पाणी द्यावे लागते. त्यात बिबट्याची दहशत, त्यामुळे वीज वितरण कंपनीने दिवसा वीज पुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.





