Pune: कचरा प्रक्रिया प्रकल्पातून निघणार्या वाहनांना ‘जीपीएस ट्रॅकिंग’

पुणे – शहरात मिक्स कचर्यावर प्रक्रिया केल्यानंतर तयार होणारे जळाउ इंधन (आरडीएफ) सिमेंट कंपन्या अथवा ऊर्जा निर्मिती प्रकल्पांपर्यंत पोहोच होईपर्यंत ट्रॅकिंग केले जाणार आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने सर्वच कचरा प्रक्रिया प्रकल्पांतून आरडीएफची वाहतूक करणार्या वाहनांना जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम बंधनकारक केली आहे. तसेच संबधित कंपन्यांना आरडीएफ मिळाल्याच्या पावत्याही सादर करणे बंधनकारक केले आहे.
पुणे शहरात दररोज सुमारे दोन हजार टनांहून अधिक टन कचरा जमा होतो. सणासुदीच्या काळात यामध्ये वाढ होते. याची विल्हेवाट लावताना निर्माण होणाऱ्या आरडीएफचीही शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे आदेश केंद्रीय आणि राज्य प्रदूषण मंडळांने दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर नव्या बायोमायनिंग प्रकल्पासह यापूर्वी सुरू झालेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पांसाठी आरडीएफची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येते का नाही याचा ट्रॅक ठेवण्यासाठी नव्याने आदेश दिले आहेत.
महापालिकेच्यावतीने प्रकल्प चालक कंपन्यांना देण्यात येणार्या टिपिंग फीची ७५ रक्कम दिली जाणार आहे. संबधित प्रकल्प चालकांनी सिमेंट अथवा वीज निर्मिती कंपन्यांकडील आरडीएफच्या मिळाल्याच्या पावत्या सादर केल्यानंतरच उर्वरीत २५ टक्के बिल अदा करण्यात येईल, असे या नवीन आदेशात नमूद करण्यात आले आहे.
यामध्ये यापूर्वीच्या प्रकल्पांच्या अटीशर्तींमध्ये नसलेली परंतु, प्रकल्पाला सुसंगत असलेली अट बंधनकारक केली आहे. यामध्ये प्रकल्पांमध्ये तयार झालेले आरडीएफ सिमेंट कंपनी अथवा वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये नेणार्या वाहनांना जीपीएस बंधनकारक करण्यात आले आहेत. यासोबतच आरडीएफ पुरवत असल्याबाबतचे संबधित सिमेंट अथवा वीज, उर्जा निर्मिती प्रकल्पाचे प्रमाणपत्र प्रत्येक ट्रकमधून आलेल्या आरडीएफच्या वजनांच्या नोंदी बंधनकारक करण्यात आल्या आहेत.
….त्या कचरा ट्रकचा तपासच नाही
महापालिकेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पात तयार होणारे आरडीएफ सिमेंट अथवा वीजनिर्मिती करणार्या कंपन्यांना पुरवणे बंधनकारक असताना जिल्ह्यातील अन्य कंपन्या आणि गुर्हाळांना आरडीएफचा पुरवठा होत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.
नुकतेच दौंड तालुक्यातील देउळगाव वाडा या गावातील एका कंपनीला आरडीएफ ऐवजी प्लॅस्टिक, चिंध्या आणि अन्य जळाऊ कचरा घेउन निघालेला ट्रक ग्रामस्थांनी अडवून यवत पोलिसांच्या ताब्यात दिला. पोलिसांनी याप्रकरणी चालकावर पर्यावरण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. या चालकाने हा कचरा पुणे महापालिकेच्या रामटेकडी येथील प्रकल्पातून आणल्याचे पोलीस चौकशीत सांगितले. या आधीही असे प्रकार समोर आले आहेत.




