Shirur Crime – जातेगाव खुर्द (ता. शिरूर) येथील एका ढाब्याजवळ उभा केलेल्या कंटेनरचे दहा टायर आणि एक स्टेपनी चोरून चालक फरार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुंबई येथील ट्रान्सपोर्ट कंपनीच्या तक्रारीवरून शिक्रापूर पोलिसांनी चालक इरशाद अहमद याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. जीपीएस प्रणालीच्या मदतीने कंपनीने वाहनाचा शोध घेतला असता हा चोरीचा प्रकार समोर आला. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथील रमण रोडवेज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा कंटेनर (क्रमांक जीजे १८ बी डब्ल्यू ७५७२) घेऊन चालक इरशाद अहमद हा गुजरातवरून रांजणगाव एमआयडीसीत माल खाली करण्यासाठी आला होता. काम संपवून पुन्हा पुण्याकडे जात असताना त्याने जातेगाव खुर्द येथील पंजाबी खालसा ढाब्यासमोर मोकळ्या जागेत गाडी उभी केली. त्यानंतर चालकाचा कंपनीशी संपर्क तुटल्याने मालकांना संशय आला. ट्रान्सपोर्ट मालकांनी तातडीने जीपीएस लोकेशन तपासून त्या ठिकाणी दुसऱ्या चालकाला पाठवले. दुसऱ्या चालकाने घटनास्थळी पोहोचल्यावर पाहिले असता, कंटेनर तिथेच उभा होता मात्र त्याचे दहा मुख्य टायर आणि एक स्टेपनी गायब असल्याचे दिसून आले. चालक इरशाद अहमद हा टायर चोरून पसार झाला असल्याचे स्पष्ट झाल्याने, कंपनीचे प्रतिनिधी प्रकाश आनंदा पवार (वय ४९, रा. कामोठे, नवी मुंबई) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी चालक इरशाद अहमद (रा. प्रतापगड, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, पोलीस हवालदार अतुल पखाले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.