Koyna Hydroelectric Project – सह्याद्रीच्या कुशीत वसलेला कोयना धरण व कोयना जलविद्युत प्रकल्प यांनी पुन्हा एकदा आपल्या दमदार कामगिरीने राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात ठसा उमटवला आहे. क्षमतेपेक्षा जास्त विक्रमी वीजनिर्मिती करत प्रकल्पाने नवा मानदंड प्रस्थापित केला असून, राज्य शासनाच्या उपविधान समितीच्या पाहणी दौऱ्यात या कार्यक्षमतेवर समाधानाचा शिक्कामोर्तब करण्यात आली. समितीने कोयना धरण व जलविद्युत प्रकल्पाच्या सर्व टप्प्यांची प्रत्यक्ष पाहणी करत वीज निर्मिती प्रक्रियेतील प्रत्येक घटकाची सखोल तपासणी केली. टर्बाइन, जनरेटर, नियंत्रण कक्ष तसेच सुरक्षा यंत्रणा यांची बारकाईने पाहणी करत कार्यक्षमतेचा सर्वांगीण आढावा घेण्यात आला. या पाहणी दौऱ्यात समिती प्रमुख प्रतापराव चिखलीकर, सुधीर गाडगीळ, सिद्धार्थ खरात, उमा खापरे, संजय खोडके, संजय पूरम, जगन्नाथ अभ्यंकर, नारायण कराड, घनश्याम पाटील आणि विनोद महाडीक यांनी सहभाग घेतला. यावेळी महानिर्मिती कंपनी व कोयना वीज संकुलचे मुख्य अभियंता संजय चोपडे यांनी समिती सदस्यांचे स्वागत केले. कार्यकारी अभियंता महेश रासनकर, व उपअभियंता आशिष जाधव यांनी प्रकल्पाच्या कामकाजाची माहिती दिली. महानिर्मिती कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. प्रकल्पाच्या कार्यक्षमतेबरोबरच सुरक्षिततेच्या उपाययोजनांचाही समितीने बारकाईने आढावा घेतला. नियमित देखभाल, तांत्रिक सज्जता आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा यामुळे प्रकल्पाची विश्वासार्हता अधिक मजबूत झाल्याचे सदस्यांनी नमूद केले. प्रकल्पाचा शासनाकडून गौरव व्हावा राज्याला तिमिराकडून तेजाकडे नेणाऱ्या कोयना धरण व कोयना जलविद्युत प्रकल्प यांनी राज्याच्या तिजोरीत मोठे आर्थिक योगदान दिले आहे. या प्रकल्पाचा राज्य शासनाकडून व्यापक पातळीवर गौरव व्हावा, असे मत प्रतापराव चिखलीकर व सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केले. एकूणच, क्षमतेपेक्षा जास्त विक्रमी वीजनिर्मिती करत कोयना प्रकल्पाने आपली कार्यक्षमता ‘टॉप’ असल्याचे पुन्हा सिद्ध केले असून, भविष्यातही हीच कामगिरी कायम राखण्याचा विश्वास उपविधान समितीने व्यक्त केला.