Pune: पर्यटन, देवदर्शनासाठी चला एसटीने…

पुणे – उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पर्यटन, देवदर्शनाला जायचे तर राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसने जावा. प्रावाशांसाठी एसी आणि अलिशान बस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे प्रासंगिक करारामध्ये सहलीसाठी ४५ नागरिकांनी एकत्रित येऊन बुकींग केल्यास त्यांना मागणीनुसार बस दिली जाणार असून, नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
एसटी महामंडळाच्या स्वारगेट आगारामार्फत बंगळुरू-म्हैसूर, उटी थंड हेवेच्या ठिकाणी, धार्मिक दर्शन जाण्यासाठी सात दिवस, नऊ दिवसांचे पॅकेजही तयार करण्यात आले आहे. येत्या ११ ते १७ मे दरम्यान बंगळुरू-म्हैसूर उटी येथे सात दिवसांच्या सहलीचे आयोजन केले आहे. तसेच, २२ ते २८ मे या कालावधीत व्दारका सोरटी, सोमनाथ गिरनार, अक्षरधाम अशी सात दिवसांची गुजरात दर्शन सहल असणार आहे. देशभरातून रामभक्त अयोध्यामध्ये दाखल होत आहेत.
प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी आता एसटीनी पुणेकरांनाही अयोध्येला जाता यावे, यासाठी ३ ते १२ जूनला अयोध्या, वाराणसी, प्रयागराज, उज्जैन ओंकारेश्वर अशा दहा दिवसांच्या सहलीचे नियोजन केले आहे. या तिन्ही ठिकाणी जाण्यासाठी शिवनेरी बस असणार आहे. तसेच, कोणाला साधी बस हवी असेल तर प्रासंगिक करारावर देण्यात येईल. यामध्ये ४५ लोक एकत्र येऊन बस बुक करू शकता.
यामध्ये साधी बस प्रति किलोमीटर ५५ रुपये, तर शिवनेरी १०० प्रति किलोमीटर दराने देण्यात येते. पर्यटन व धार्मिक देवदर्शनाचा लाभ जास्तीत जास्त प्रवाशांनी घ्यावा. त्यासाठी स्वारगेट आगाराशी संपर्क साधावा, असे आवाहन स्वारगेट आगाराच्या वतीने करण्यात आले आहे.





