Pune : जा रे जा रे पावसा ! पुणेकरांची धांदल : परतीच्या पावसानंतर अवकाळीची संततधार

पुणे : शहरासह उपनगरांत सकाळपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे पुणेकरांची धांदल उडाली. दिवसभर ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरी पडत असल्यामुळे कमाल तापमानात लक्षणीय घट झाली. हवेत गारवा वाढला आहे. शहरासह जिल्ह्यातही पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडल्या. गेली आठवडाभर शहरात अवकाळी पाऊस सकाळ, दुपार, संध्याकाळ केंव्हाही सुरू होत आहे. थंडीचा महिना सुरू होत असताना पावसाची संततधार सुरू असल्याने आजा जा रे जा रे पावसा, अशी विनवणी पुणेकर करू लागले आहेत.
शहरात परतीचा मान्सून धुमाकुळ घालेल असे वाटत होते. मात्र, एक-दोन दिवस पावसाच्या हलक्या सरी पडल्या आणि मान्सून राज्यासह भारातून माघारी गेला. १ तारखेपासूनच आॅक्टोबर हिट सुरू झाली. पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यात उन्हाचा चटका जाणवू लागला. परिणामी, कमाल तापमान ३५ अंशाच्या पुढे गेले. मात्र, त्यानंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, मागील आठ ते दहा दिवसांपासून पावसाचा जोर कमी-अधिक होत आहे. गेल्या ४८ तासांत पावसाचा जोर वाढल्यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि पावसाच्या हलक्या तर जिल्ह्यात मध्यम सरी पडत आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी शनिवारी (दि. १) सकाळपासून पावसाची भुरभुर सुरू झाली. काही ठिकाणी धुके पसरले. थोडावेळ पडेल आणि हवामान कोरडे होईल, असे वाटत असताना, पावसाचा जोर वाढला. दिवसभर ढगाळ वातावरण आणि पावसाची संततधारेमुळे पुणेकरांची धांदल उडाली. आकाशात काळे ढग भरून आल्यामुळे दुपारीच अंधार पडल्यासारखी स्थिती होती. तर कमाल तापमानातही दोन ते तीन अंशाने घट झाली.
रात्री उशीरापर्यंत हलक्या सरी…
शहरात पावसाची संततधार सुरू आहे. रात्री उशीराही काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. लोहगांव आणि भोर परिसरात ५, चिंचवड येथे ४, शिवाजीनगरला ३, पाषाण येथे २, एनडीए, राजगुरूनगर आणि हवेली परिसरात प्रत्येकी १ मिमी पावसाची नोंद झाली. कमाल तापमान २३ अंशापर्यंत खाली आल्यामुळे वातावरणात गारवा जाणवत आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यात आकाश सामान्यत: ढगाळ राहील, तर हलक्या सरी पडण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.





