पुणे – विमानतळ पोलिसांनी अवघ्या काही तासांत कारवाई करून अपहृत तीन वर्षांच्या मुलीची सुटका केली आहे. कामावरुन काढून टाकल्याच्या रागातून दोघा कामगारांनी पर्यवेक्षकाच्या मुलीचे अपहरण केले होते. तक्रारदार शिवशंकर कुमार पासवान ( २६) यांच्या तक्रारीनूसार, त्यांची लहान मुलगी कशीश ( ३) ही २२ सप्टेंबर रोजी दुपारी पाच वाजल्यापासून हरवली होती. मुलीच्या बेपत्ता होण्यामागे प्रिन्स पॉल ( २५) व ओमनारायण पासवान (२०, (दोघेही रा. लेबर कॅम्प, म्हाडा कॉलनी, विमाननगर, मूळगाव बिहार)) या दोघांचा हात असल्याची शक्यता व्यक्त होत होती. कामावरून काढून टाकल्याचा राग धरून आरोपींनी मुलीचे अपहरण केल्याची शंका तक्रारदारांनी व्यक्त केली होती. तक्रार मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन राठोड, सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे व शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तयार केली. लेबर कॅम्प परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच आरोपींच्या मोबाईल लोकेशनवरून शोध मोहीम सुरू झाली. सुरुवातीला आरोपींचे लोकेशन तळेगाव दाभाडे परिसरात आढळले. त्यानंतर लोणावळा व नंतर रेल्वे मार्गावर हालचाल होत असल्याचे स्पष्ट झाले. इंद्रायणी एक्सप्रेसने आरोपी प्रवास करत असल्याचे कळताच रेल्वे पोलिसांना अलर्ट करण्यात आले. तत्काळ समन्वय साधून कल्याण रेल्वे स्टेशनवर आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांना पकडून तीन वर्षांची कशीश हिला सुखरूप आई-वडिलांच्या ताब्यात दिले.या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत माने करत आहेत.