पुण्यातील मानाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात ; मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपती मंडईमध्ये दाखल

Pune Ganpati Visarjan 2025। पुण्यात पारंपरिक ढोल-ताशांच्या तालावर, लेझीमच्या झंकारात आणि गुलालाच्या उधळणीत श्रद्धाळू मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. वातावरणात “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” अशा जयघोषांचा उत्साह दाटून आला आहे. दरम्यान , पुण्याच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.
पुण्याचा मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपती चांदीच्या पालखीत कसबा गणपती विराजमान झाला असून मंडईमध्ये दाखल झाला आहे. दरम्यान, गणेश उत्सवावर सध्या पावसाचे सावट दिसून येत आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण असून पावसाच्या हलक्या सारी देखील बरसून गेल्या आहेत. मात्र या सर्वांमध्ये तरुणाईचा देखील उत्साह कायम असल्याचे दिसत आहे.
तरुणाईने दरवर्षीप्रमाणे पारंपरिक वेशभूषा केली असून ढोल ताशांचा निनाद सनई चौघड्याचे मंगलमयसूर सगळीकडे ऐकायला मिळत आहेत. दरम्यान, लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी शहरातील चौका चौकात भव्यदिव्य रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या आहेत. अशा वातावरणात राज्य महोत्सवाच्या सांगतेला पुण्यातून सुरुवात झाली आहे.





