थोड्याच वेळात मानाचा पहिला कसबा गणपती अलका चौकात दाखल होणार

Pune Ganpati Visarjan 2025। पुण्यात पारंपरिक ढोल-ताशांच्या तालावर, लेझीमच्या झंकारात आणि गुलालाच्या उधळणीत श्रद्धाळू मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. वातावरणात “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” अशा जयघोषांचा उत्साह दाटून आला आहे. दरम्यान, पुण्यात मानाच्या पाचही गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.
पुण्यातील मानाचा पहिला गणपती कसबा गणपती विसर्जन मिरवणूक हळूहळू पुढे सरकारत आहे. ढोलताशाच्या गजरात विसर्जन मिरवणूक आता थोड्याच वेळात अलका चौकामध्ये दाखल होणार आहे.
चौकात भव्य अशी रांगोळी काढली गेली आहे. थोड्यावेळाने पहिला मानाचा गणपती अलका चौकात पोहोचेल. राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने ही रांगोळी साकारण्यात आली आहे. दरम्यान, विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर सर्वत्र रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत.
दरम्यान, पुण्यात विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.





