PUNE: गुंड शरद मोहोळ यांचा गोळ्या झाडून खून

पुणे – कोथरुडमधील गुंड शरद मोहोळ याच्यावर पिस्तूलातून चार गोळ्या झाडण्यात आल्या. यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मोहोळ याच्या कार्यालयासमोर घडली. मोहोळचा जुना साथीदार साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर (रा. सुतारदरा, कोथरुड) आणि साथीदारांनी मोहोळला गाठले आणि गोळीबार केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनसार, शहर मोहोळ याच्या लग्नाचा शुक्रवारी वाढदिवस होता. यामुळे त्याच्या कार्यालयात नातेवाईक आणि चाहत्यांची गर्दी होती. शुभेच्छा स्वीकारल्यानंतर देवदर्शनासाठी कार्यालयातून बाहेर पडत होता. इतक्यात गर्दीतून चौघे जण पुढे आले. त्यांनी जवळूनच मोहोळ याच्यावर पिस्तूलातून चार गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळला आधी खासगी रुग्णालयात आणि तेथून ससून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, गोळीबार झाल्याची माहिती कळताच शेकडोच्या संख्येने मोहोळ याचे कार्यकर्ते रुग्णालयाबाहेर जमले होते. दहशतवादी कातील सिद्दीकीचा येरवडा कारागृहात अंडा सेलमध्ये खून झाला होता. त्याचा खुनाचा आरोप मोहोळवर होता. यानंतर तो देशभर चर्चेत आला होता. या गुन्ह्यात साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर (रा. सुतारदरा, कोथरुड) आणि अन्य तिघे साथीदार फरार आहेत. त्यांनी गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पाळत ठेवल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, मोहोळविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, सरकारी कामात अडथळा आणणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
कातिल सिद्दीकीच्या खुनानंतर देशभर चर्चेत
येरवडा कारागृहातील अंडा सेलमध्ये जर्मन बेकरी बाॅम्बस्फोट प्रकरणातील आरोपी कतिल सिद्धीकी याचा गळा आवळून खून केला होता. याप्रकरणात मोहोळ आणि त्याचा साथीदार अलोक भालेराव यांना अटक करण्यात आली होती. अतिसुरक्षित समजल्या जाणाऱ्या येरवड्यातील अंडा सेलमध्ये माेहोळ आणि भालेराव यांनी कतिलचा खून केल्यानंतर तो देशभर चर्चेत आला होता.
सिद्धीकी खून प्रकरणात तपास यंत्रणांकडून मोहोळची याप्रकरणात चौकशी करण्यात आली होती. २६ जून २०१६ रोजी न्यायालयाने कतिल सिद्धीकी प्रकरणात मोहोळ अणि भालेरावची मुक्तता केली. त्यानंतर मोहोळ विविध राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ लागला. त्याच्या पत्नीने एका राजकीय पक्षाचे काम सुतारदरा परिसरात सुरू केले होते.
…अन् शरद मोहोळचा गुन्हेगारी विश्वात प्रवेश
शरद मोहोळ मुळशी तालुक्यातील एका गावातील होता. अतिशय सामान्य परिस्थितीत तो वाढला. त्याचे आई – वडील शेतकरी होते. गुंड संदीप मोहोळचा ड्रायव्हर म्हणून शरद मोहोळ आधी काम करत होता. मात्र, पुण्यात संदीप मोहोळची हत्या झाली. त्यानंतर सन २००६ च्या आसपास शरद मोहोळ याचा गुन्हेगारी विश्वात प्रवेश झाला. यावेळी मारणे गँगच्या सुधीर रसाळ याची बाबा बोडके गँगच्या संदीप मोहोळने हत्या केली होती. या हत्येनंतर पुण्यात टोळीयुद्धाला सुरुवात झाली होती. या हत्येचे प्रत्युत्तर म्हणून मारणे टोळीने संदीप मोहोळची हत्या केल्याचे त्यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान, संदीप मोहोळची हत्या ही घटनाच शरद मोहोळचा गुन्हेगारी विश्वातील प्रवेशाचा टर्निंग पॉइंट ठरली. संदीपची हत्येनंतर पुण्यात गँगवॉर मोठ्या प्रमाणात वाढले. याच काळत शरद मोहोळने सूत्रे हाती घेतली. त्याने २०१० मध्ये संदीपच्या हत्येचा बदला घेत घटनेचा सूत्रधार किशोर मारणे याची हत्या केली. या हत्येसाठी शरद मोहोळला न्यायालयाने जन्मठेप सुनावली होती. याच काळात त्याने कातिल सिद्दीकीचा खून केला होता.





