Pune : पुण्यात टोळी युद्धाचा भडका

– वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपीच्या भावाचा खून
– आयुष कोमकर खूनानंतर पुन्हा एकदा रक्तरंजित हल्ला
पुणे – शहरात पुन्हा एकदा टोळीयुद्धाचा भडका उडाला आहे. कोंढवा परिसरात झालेल्या भीषण हल्ल्यात रिक्षाचालक गणेश काळे (वय ३५, रा.आंबेगाव) या तरुणाची अज्ञातांनी सहा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केली. ही घटना दुपारी येवलेवाडी येथील पेट्रोलपंपाजवळ घडली. हल्लेखोर दुचाकीवरून आले होते आणि गोळीबारानंतर काही क्षणातच पसार झाले.
पोलिसांच्या माहितीनुसार मृत गणेश काळे हा सोम्या गायकवाड टोळीतील सक्रिय सदस्य समीर काळेचा भाऊ आहे . समीर काळे हा वनराज आंदेकर खूनप्रकरणात वापरलेली ९ पिस्तुले मध्यप्रदेशातून आणणारा प्रमुख दुवा होता. वनराज आंदेकरचा खून हा सोम्या गायकवाड आणि कोमकर कुटूंबाशी असलेल्या वादातून झाल्याचे समोर आले होते. सध्या, समीर काळे कारागृहात असून त्याचा भाऊ गणेश याची हत्या झाल्याने हा टोळी युद्धातील प्रतिशोधाचा प्रकार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आयुष कोमकर खूनानंतर पुन्हा रक्तरंजित हल्ला
मागील महिन्यात आयुष कोमकर खून प्रकरणाने पुण्यात खळबळ माजवली होती. त्या घटनेतही आंदेकर टोळीने वर्चस्व आणि प्रतिशोध म्हणून हल्ला केला होता. आता, गणेश काळेचा खून घडल्याने टोळ्यांतील वैर आणि परस्पर सूडभावनेने पुन्हा डोकेवर काढल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, आंदेकर टोळी, कोमकर आणि सोम्या गायकवाड टोळी सध्या कारागृहात आहेत. दोन्ही टोळ्यांना मोक्का लागला आहे. तर, दुसरीकडे बंडू उर्फ सुर्यकांत आंदेकरचे आर्थिक साम्राज्याला पोलिसांनी उधवस्त केले आहे. मात्र, त्यानंतरही ही घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे. वनराज आंदेकर खून प्रकरणी सोम्या गायकवाड आणि कोमकर कुटूंबातील १९ सदस्य तर आयुष कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीतील १६ सदस्य कारागृहात आहेत.
घटनास्थळावरून तीन रिकाम्या पुंगळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. संशयितांची ओळख पटली आहे, त्यांच्या मागावर सात पथके पाठवली आहेत. आरोपींना लवकरच अटक केली जाईल.
– निखील पिंगळे, पोलीस उपायुक्त (गुन्हे)





