Pune Ganeshotsav: नव्या चवीला पुणेकरांची पसंती! बाजारात ‘या’ मोदकांची तुफान मागणी…जाणून घ्या काय आहे खास?
Pune Ganeshotsav: तूप, दूध अन् पॅकेजिंग महागल्याने मिठाई १० टक्क्यांनी महाग; तरीही मोदक आणि फराळाच्या प्री-बुकिंगला पुणेकरांचा उदंड प्रतिसाद.

Pune Ganeshotsav – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिठाई आणि फराळ खरेदीसाठी लगबग सुरू झाली असून, मोदकांसह पारंपरिक मिठाई, फराळ आणि नैवेद्यासाठी लागणाऱ्या पदार्थांच्या मागणी वाढली आहे. उकडीचे आणि खव्याचे मोदक ग्राहकांच्या पसंतीत आघाडीवर असले तरी चॉकलेट, फळांचे फ्लेवर्स, ड्रायफ्रूट तसेच कमी गोडीच्या मोदकांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे मिठाई व्यावसायिक सांगतात.
यंदा दोन दिवसांच्या सुट्टीनंतर गणेशोत्सव साजरा होत असल्याने मोदक आणि फराळासाठी खरेदी तसेच प्री-बुकिंगला सुरुवात झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या सुट्ट्यांमध्ये कोकणासह बाहेरगावी जाणारे पुणेकरही यंदा पुण्यातचं मोदक आणि फराळाची खरेदी करीत असल्याने मागणी वाढली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक उकडीचे आणि माव्याचे मोदक सर्वाधिक लोकप्रिय असून नव्या प्रकारांनाही ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे.
गौरी-गणपतीसाठी आरास आणि फराळाची तयारी सुरू झाल्याने लाडू, अनारसे, करंजी, चकली, कडबोळी, शंकरपाळी, चिवडा आणि विविध मिठाईच्या पदार्थांची मागणीही वाढली आहे. पारंपरिक पदार्थांना कायम पसंती असली तरी ग्राहकांच्या बदलत्या आवडीनुसार नवीन चवी आणि कमी गोडीचे पदार्थ बाजारात उपलब्ध झाले आहेत.
यात काही व्यावसायिक साखरेच्या जागी गुळाचा वापर करीत आहेत. तर अनेक ठिकाणी कमी साखरेसह सुका मेवा टाकलेल्या फ्युजन मोदकांना साखरेची गरज नसल्याने त्यांचीही मागणी वाढत असल्याचे व्यावसायिक सांगतात. दरम्यान, तूप, साखर, दूध, गॅस आणि पॅकेजिंग साहित्याच्या वाढलेल्या किमतींचा परिणाम मिठाईच्या दरांवर झाला आहे.
त्यामुळे मिठाईत सुमारे १० टक्क्यांपर्यंत दरवाढ करण्यात आली आहे. तरीही गणेशोत्सवातील वाढती खरेदी आणि नैवेद्यासाठी मोदकांची कायम असलेली मागणी यामुळे यंदाचा हंगाम उत्साहवर्धक ठरण्याची अपेक्षा व्यावसायिकांनी व्यक्त केली.
“गणेशोत्सवासाठी यंदा ग्राहकांची खरेदी आणि प्री-बुकिंग मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. उकडीच्या मोदकांचे बुकिंगही वाढत आहे. पारंपरिक प्रकारांसोबत चॉकलेट, स्ट्रॉबेरी, बिस्कॉफ, ब्लूबेरी, क्रॅनबेरी, पिस्ता आणि अंजीरसारख्या ११ प्रकारच्या नव्या चवीचे मोदकांसह फ्युजन मोदक आमच्याकडे उपलब्ध असून, त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.”
– अमित गाढवे, काका हलवाई
“गणेशोत्सवात नैवेद्यासाठी मोदकांना मोठी मागणी असते. यंदाही मागील वर्षाप्रमाणे चांगला प्रतिसाद अपेक्षित आहे. पारंपरिक प्रकारांसोबत आंबा, काजू, ब्लूबेरी, क्रॅनबेरी, पिस्ता, बटरस्कॉच, चॉकलेट आणि केशर-बदाम अशा नऊ प्रकारचे मोदक आमच्याकडे उपलब्ध आहेत.”
– केदार चितळे, चितळे बंधू
सर्वोच्च स्वच्छता मानकांनुसार उत्पादन प्रक्रिया
भेसळयुक्त खवा-माव्यावरील अन्न व औषध प्रशासनाच्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्य जागरूकता वाढली असून मिठाई व्यावसायिकही उत्पादन प्रक्रियेतील स्वच्छता आणि कच्च्या मालाच्या गुणवत्तेवर भर देत आहेत. त्यांना लागणारा खवा आणि मावा गेल्या अनेक वर्षांपासून काका हलवाई स्वतः तयार करीत असून, त्यांच्याकडून उत्पादन प्रक्रियेवर थेट नियंत्रण ठेवले जाते.






