Pune Ganeshotsav 2021 : गणेशोत्सव साध्या पध्दतीने मात्र बंदोबस्त तगडाच

पुणे – गणेशोत्सवावर सलग दुसऱ्यावर्षी कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे शासनाच्या आवाहनानूसार गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. तरी देखील काही अनुचित प्रकार होऊन नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त शहरात ठिकठिकाणी असणार आहे.
गणेश उत्सवासाठीच्या बंदोबस्तामध्ये सुमारे सात हजार पोलिस कर्मचारी, सातशे अधिकारी, शीघ्र कृती दल, गुन्हे शाखेची पथके, श्वान पथक, छेडछाड विरोधी पथक, होमगार्ड, फिरते नियत्रण कक्ष राज्य राखीव पोलिस दलाच्या, तुकड्यांचा समावेश राहणार आहे. दरम्यान नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून आचरसंहिता तयार करण्यात आली आहे. बंदोबस्तामध्ये पोलिसांकडून आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. महापालिकेच्या वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळे, लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजीत केली होती. यावेळी सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने सर्वांनी एकमताने हा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरविले आहे.
“यंदा देखील उत्सवावर कोरोनाचे सावट आहे. शहरातील गणेश मंडळांनी साध्यापद्धतीने उत्सव साजरा करण्यास करण्यास सहमती दर्शविली आहे. मंडळांनी आचरसंहितेचे पालन करून सर्वोतोपरी पोलिसांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र यावेळी नागरिकांनी देखील आपली एक सामाजिक जबाबदारी समजून स्वयंशिस्त पाळून पोलिसांना सहकार्य करावे.”
– डॉ. रवींद्र शिसवे, पोलिस सहआयुक्त पुणे शहर





