पुणे : पोलिसांकडून गणेश मंडळे दत्तक

पुणे –शहरातील गणेशोत्सवाला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. तसेच गणेश मंडळांची आरासही आकर्षणाचा बिंदू असते. मात्र, मागील वर्षी तसेच यंदाही करोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला जाणार आहे.
असे असले तरी पोलिसांचा बंदोबस्त नेहमीप्रमाणेच असणार आहे. यातच मंडळे करोना नियमांचे पालन करतात की नाही तेही अतिरिक्त काम म्हणून पहावे लागणार आहे. यापार्श्वभूमीवर शहरातील मध्यवर्ती भागातील गणेश मंडळे पोलिसांकडून प्राधिनिधीक स्वरूपात सुरक्षेसाठी व करोना नियमावलीसाठी दत्तक घेण्याचा उपक्रम राबवला जाणार आहे.
पुणे शहरात एकूण तीन हजार नोंदणीकृत मंडळे असून त्यापैकी दोन हजार मंडळे मध्यवर्ती भागातील खडक, फरासखाना, शिवाजीनगर आणि डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहेत. यामध्ये मानाच्या तसेच महत्त्वाच्या मंडळांचाही समावेश होतो.
गणेशोत्सव 10 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. दहा दिवसांच्या उत्सवासाठी मध्यवर्ती भागातील मंडळे शहर व परिसरातील भक्तांना देखाव्याद्वारे आकर्षीत करतात. यंदा अनेक मंडळांकडून देखावे करण्यात येणार नसले तरी मानाच्या आणि महत्त्वाच्या मंडळांच्या “श्रीं’च्या दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागतात. हा अनुभव लक्षात घेता परिमंडळ एकमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
… तर जबाबदारी पोलिसांची
पोलीस उपायुक्त (परिमंडळ -1) प्रियंका नारनवरे म्हणाल्या, एक कॉन्स्टेबल किंवा पोलीस अधिकारी विशिष्ट भागात गणपती मंडळे दत्तक घेतील. मंडळाचा आकार, उत्सव कसा साजरा केला जातो, हे तपासण्याची जबाबदारी त्यांची असेल. प्रार्थना (आरती) आणि इतर धार्मिक विधींदरम्यान गर्दी होणार नाही याची ते खात्री करतील.
मांडव किंवा मंदिरांमध्ये पाचपेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी नाही. पोलिसांना मांडवामध्ये दररोज भेटींचा चार्ट ठेवणे आवश्यक आहे. मंडळाच्या सदस्यांनी मास्क घातले आहेत का? आणि ते इतर कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत आहेत का ते तपासले जाईल. खडक, समर्थ, फरासखाना, विश्रामबाग, डेक्कन जिमखाना, आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी मंडळाचे सदस्य मंडळांना भेट देतील.





