Pune Ganesh festival : पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष ; १० हजार पोलिसांचा बंदोबस्त
Pune Ganesh festival :

Pune Ganesh festival : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. मानाच्या पाच गणपतीसह , श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती आणि शहरातील विविध गणेश मंडळांच्या मिरवणुका उत्साहात पार पडणार आहेत.
विसर्जन सोहळा शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी पुणे पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातील प्रमुख विसर्जन मार्ग आणि संवेदनशील भागांमध्ये सुमारे १० हजार पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात राहणार आहेत.
मानाचा पहिला कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीची तयारीही पूर्ण झाली आहे. पर्यावरणपूरक हरित रथातून मिरवणुकीला सुरुवात होणार असून, त्यानंतर बाप्पा चांदीच्या रथातून मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.
सकाळी साडेनऊच्या सुमारास लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला हार अर्पण केल्यानंतर कसबा गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करणार आहे. त्यामुळे बाप्पाचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी पुणेकर मोठ्या संख्येने गर्दी करण्याची शक्यता आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीचीही तयारी पूर्ण झाली आहे. उत्सव मंडपातून बाप्पाला मुख्य मंदिराकडे नेऊन विराजमान करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी चार वाजता दगडूशेठ गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, विसर्जन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी बुधवारी शहरात रूट मार्च काढत बंदोबस्ताची रंगीत तालीम केली. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या माहितीनुसार, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता आणि केळकर रस्ता या चार प्रमुख मार्गांवरून एकूण ६३८ गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका निघणार आहेत.
यापैकी १५० मंडळांना कुमठेकर आणि केळकर रस्त्यावरून मिरवणूक काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी शहरात २६ ठिकाणी वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबईतही अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विशेष तयारी केली आहे. गिरगाव चौपाटीसह विविध विसर्जन स्थळांवर महापालिकेकडून आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात ३८३ हून अधिक कृत्रिम तलाव आणि ६७ नैसर्गिक विसर्जन स्थळे तयार करण्यात आली आहेत.
नागरिकांना जवळचे विसर्जन स्थळ सहज शोधता यावे, यासाठी गुगल मॅप्स आणि क्यूआर कोडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच यंदा स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन कक्षही कार्यान्वित करण्यात आला आहे.





